दापोली अपघातात जखमी क्रीडापटू भूमीचा अखेर मृत्यू

दापोली:- क्रीडा क्षेत्रात निपुण अशी कामगिरी असणाऱ्या हर्णे येथील भूमी सावंतचे क्रीडा क्षेत्रातील स्वप्न अधुरेच राहिले. हर्णे मार्गावरील आसुद जोशी आळी येथे आठ दिवसांपुर्वी झालेल्या अपघातात भूमी गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी (दि.२) तिचा मृत्यू झाला. ती लाठी काठी स्पर्धेत सुवर्णपदक विजेती होती.

हर्णे मार्गावरील आसुद जोशी आळी येथील एका वळणावर दापोलीतुन आंजर्लेकडे प्रवासी वाहतूक करणारी मँक्झिमो व दापोलीकडे येणारा ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत पाच प्रवाशी जागीच ठार झाले होते. तर दोघाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. एकूण १४ प्रवाशी या गाडीतून प्रवास करत होते. या अपघातात भूमी जखमी झाली होती. तिला मुंबई येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र दि २ रोजी रात्री उपचारा दरम्यान तिची प्राणज्योत मालवली. भूमी हिने लाठी खेळात राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट अशी कामगिरी केली होती. दापोलीतील ए.जी हायस्कुल येथे भूमी १२ वी इयत्तेत शिकत होती. शांत स्वभाव पण खेळात ती चाणाक्ष होती. दापोली तालुक्यातील लाठी असोसिएशनची ती सदस्य होती. अनेक सुवर्णपदके तीने पटकावली होती. तिच्या अपघाती मृत्यू बद्दल दापोली तालुक्यातील क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या दिवशी भूमीचा अपघात झाला त्या दिवशी सकाळी एका विशेष कार्यक्रमात तिचा सत्कार करण्यात आला होता. हा कार्यक्रम झाल्यानंतर भूमी आपल्या घरी निघाली होती.