वंदे भारतला प्रवाशांची पंसती;
पहिल्या दिवशी ५३० प्रवाशांनी केला प्रवास

रत्नागिरी:- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगावदरम्यान प्रवाशांना घेऊन बुधवारी प्रथमच धावलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या पहिल्या फेरीमधून ५३० प्रवाशांनी प्रवास केला. यामध्ये रत्नागिरी स्थानकापर्यंत सर्वाधिक १४३ प्रवाशांनी तर त्या खालोखाल १०५ प्रवाशांनी मडगावपर्यंत प्रवास केला. पहिल्याच नियमित फेरीतून मध्यरेल्वेला सहा लाख ४८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मडगाव ते मुंबई या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास सुरू झाला. मुंबई सीएसटी ‚ मडगाव या गाडीची पहिली कमर्शियल रन बुधवारी सुरू झाली. या फेरीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एकूण ५३० आसनांपैकी ४७७ इतक्या आसनांचे म्हणजे ९० टक्के इतके आरक्षण पहिल्या दिवशी झाले. हा प्रतिसाद रेल्वेसाठी उत्साहवर्धक ठरला आहे. यामधून रत्नागिरीला चेअर कार डब्यातून १४१ तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारमधून दोन अशा एकूण १४३ प्रवाशांनी पहिला प्रवास केला.

पहिल्या फेरीच्या अधिकृत प्रवासी तक्त्यानुसार, त्या खालोखाल मडगावपर्यंत ९२ प्रवाशांनी चेअर कारमधून तर १९ जणांनी एक्झिक्युटिव्ह चेअर कारमधून असा मडगावपर्यंत एकूण १०५ प्रवाशांनी प्रवास केला. मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणार्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसने खेडपर्यंत ४१ प्रवाशांनी चेअर कारमधून तर सहाजणांनी एक्झिक्युटिव्ह चेअर कारमधून असा एकूण ४७ जणांनी वंदे भारत एक्स्प्रेसचा पहिला प्रवास केला. या गाडीतून सिंधुदुर्गातील कणकवली स्थानकावर ८६ जणांनी चेअर कारची तर चारजणांनी एक्झिक्युटिव्ह चेअर कारची अशा एकूण ९० प्रवाशांनी पहिल्या डाउन वंदे भारत एक्स्प्रेसची कणकवलीपर्यंतच्या प्रवासाची तिकिटे बुक केली होती.

गणेशोत्सवासाठी आगाऊ आरक्षण
गणेशोत्सवात मुंबईहून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात येत असल्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसचे आरक्षण खुले होताच बुधवारपर्यंत गणेशोत्सव कालावधीतील दि. १५ ते २० सप्टेंबर २०२३ या कालावधीसाठी कोकण रेल्वेमार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसकरिता तब्बल ११० टक्के आगाऊ आरक्षण झाले आहे.