मच्छिमार महिलांना मिळणार १२ ई स्कूटर

रत्नागिरी:- जिल्ह्यातील मच्छिमारी व्यवसाय करणार्‍या महिलांना १२ ई स्कूटर नियोजन विभागाकडून मंजूर करण्यात आल्या आहेत. लवकरच या ई स्कूटरच्या मदतीने मच्छिमार महिलांच्या पारंपरिक व्यवसायाला आता नवीन स्वरूप प्राप्त होणार आहे. गावोगावी डोक्यावर माशांची टोपली घेऊन फिरणार्‍या मच्छिमार महिला आता स्वत:ची स्कूटर घेऊन मासे विक्री करताना दिसणार आहेत.

नुकतीच जिल्हा प्रशासनाच्या नियोजन विभागाकडून या ई स्कूटरसाठी ८ लाख ९५ हजाराच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. त्यातून मच्छिमार महिलांना या ई स्कूटरसाठी ३५ टक्के सबसीडी देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित महिलांनी मत्स्य व्यवसाय विभागाकडे अर्ज करायचा आहे.
लवकरच या मच्छिमारी व्यवसाय करणार्‍या महिलांना या स्कूटरचे वितरण करण्यात येणार आहे. या स्कूटरना मासे विक्री करण्यासाठी विशिष्ट क्रेट बसवण्यात येणार आहे. तसेच ती स्कूटर ज्या महिलेसाठी मंजूर करण्यात आली आहे, तिचे नाव आणि योजनेचे नावही या स्कूटरवर नमूद करण्यात येणार आहे.पालकमंत्री उदय सामंत यांनी या महिलांना ई स्कूटरसाठी ३५ टक्के सब्सिडी देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आता मत्स्य व्यवसाय विभागाकडून स्कूटरसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत.