सावधान! आज, उद्या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

रत्नागिरी:- मंगळवार रात्रीपासून जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. विना उसंत कोसळणाऱ्या पावसाचा जोर पुढील दोन दिवस वाढणार असून बुधवार आणि गुरुवारी म्हणजे पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधदुर्ग जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैऋत्य मोसमी वार्‍यांनी गेल्या रविवारपासून सातत्य ठेवले आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पश्चिम घाट, कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात 28 ते 29 जून रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगडमध्ये मंगळवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, सोमवारी सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली; तर मंगळवारी दिवसभर हलक्या सरींचे सातत्य होते.

जिल्ह्यात आतापर्यंत म्हणजे 1 जूनपासून 205 मि.मी.च्या सरासरी 1,847 मि.मी. एकूण पाऊस झाला. गतवर्षी याच कालावधीत 427 मि.मी.च्या सरासरीने 3,849 मि.मी. पाऊस झाला.

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस मि.मी. मध्ये : मंडणगड 263, दापोली 271, खेड 176, गुहागर 194, चिपळूण 172, संगमेश्वर 153, रत्नागिरी 174, लांजा 253, राजापूर 191 असा एकूण 1847 मिमी व सरासरी 205.22 मिमी पाऊस झाला.