मत्स्यविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण; ३५० जणांना बजावल्या नोटीस

रत्नागिरी:- शहरातील किल्ला ते मिरकरवाडा – पांढरा समुद्र परिसरात असलेल्या मत्स्य विभागाच्या जमिनीवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले असून येथे उभारण्यात आलेल्या बांधकामांबाबत सुमारे ३५० जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत अशी माहिती पुढे येत आहे . सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय तांत्रिक तथा अभिनिर्णय अधिकारी रत्नाकर राजम यांनी याला दुजारा दिला आहे .

रत्नागिरी शहरात सरकारी जमिनींवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अनेक ठिकाणी अनधिकृतरित्या झोपडपट्टी आणि पक्की बांधकामे उभी आहेत .रत्नागिरीतील मत्स्य विभागाच्या जमिनीवर तर मोठ्याप्रमाणात परप्रांतियांच्या झोपडपट्ट्या उभ्या असून अनेक पक्की बांधकामे आणि शेड उभारण्यात आल्या आहेत . मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत या जागेवरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केल्याने अनधिकृत बांधकामे आजही वाढत आहेत . आता सुमारे ३५० जणांना या अतिक्रमणाबाबत नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पुढे येत असून ही बांधकामे काढून टाकण्याचे या नोटीस मध्ये बजावण्यात आले आहे . याला सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय तांत्रिक तथा अभिनिर्णय अधिकारी रत्नाकर राजम यांनी दुजारा दिला आहे.