शिक्षक समितीकडून चौघांची संघटनेतून हकालपट्टी

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतपेढीची पंचवार्षिक निवडणूकीची रणधुमाळीने जोरदार उसळी घेतली आहे. येत्या 23 जुलै रोजी होणाऱया निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने संघटनेशी गद्दारी करणाऱया पकाश काजवेंसह, अरविंद पालकर, जावेद शेखर, संतोष येलकर या चौघांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतपेढीची पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शुकवारी येथील शासकीय विश्रामगृह येथे सायंकाळी पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी महाराष्ट्र राज्य पाथमिक शिक्षक समितीचे कोरगावकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष दिपक शिंदे, शिक्षक नेते विजय पंडित, राज्य पदाधिकारी बळीराम मोरे, शिक्षक नेते दिलीप महाडिक, अरविंद जाधव, राज्य कार्यकारिणी सदस्य अंकुश गोकणे, पतपेढी अध्यक्ष विलास जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष रुपेश जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष पावणे हे उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षक पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक येत्या 23 जुलै रोजी होत आहे. त्या पार्श्वभुमीवर प्राथमिक शिक्षक समितीच्या धोरणांना फाटा देत विरोधी संघटनांशी हातमिळवणी करणाऱया आणि संघटनेच्या शिस्तीला बगल देणाऱया प्रकाश काजवें विरोधात संघटनेने कारवाईचे पाउल उचलले आहे. काजवेंना जिल्हा कार्याकरिणीत त्याबाबत समजही देण्यात आलेली होती. पण त्याला न जुमानल्यामुळे समितीतून काजवे यांची कायमस्वरूपी हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच गुहागरचे तालुकाध्यक्ष अरविंद पालकर तसेच दापोलीचे जावेद शेख यांचीही हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.