शांतीनगर येथील चाकूहल्ला प्रकरणी आरोपीची बंधपत्रावर मुक्तता

रत्नागिरी:- शहरानजीक असलेल्या शांतीनगर रसाळवाडी येथे शेजाऱ्यावर चाकूने वार करणारा तरुण दोषी असल्याचा निकाल न्यायालयाने दिला. आरोपीला न्यायालयाने शिक्षा देण्याऐवजी सहा महिन्यासाठी चांगल्या वर्तवणूकीच्या १५ हजार रूपयांच्या बंधपत्रावर मुक्तता केली. जितेश संजय कदम (२९, रा. शांतीनगर रसाळवाडी) असे गुन्ह्यातील आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध शहर पोलिसांकडून दोषारोपपत्र ठेवण्यात आले होते.

रत्नागिरी मुख्य न्यायदंडाधिकारी राहूल मनोहर चौत्रे यांनी या खटल्याचा निकाल दिला. गुन्ह्यातील माहितीनुसार दिनेश सखाराम सावंत (३०, रा. शांतीनगर, रसाळवाडी, मुळ जांभरूण) यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरोपी जितेश कदम व तक्रारदार दिनेश सावंत हे शांतीनगर रसाळवाडी येथे वास्तव्य करत होते. २१ फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास दिनेश हे कामातून आपल्या शांतीनगर रसाळवाडी येथील घरी आले. यावेळी आरोपी जितेश हा त्यांच्यामागुन घरात शिरला. तुम्ही व तुमच्या बयकोने माझ्या बहिणीला पळून जाण्यात मदत केली असे बालून आपल्या खिशातून सुरा काढून दिनेश यांच्या दंडावर वार केले. अशी तक्रार दिनेश यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत दाखल करण्यात आली होती.

जितेश याने केलेल्या हल्ल्यामध्ये दिनेश यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. विनेश सावंत यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी जितेश याच्याविरूद्ध भादंवि कलम ३२४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच गुन्ह्याचा तपास करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले. सरकार पक्षाकडून अॅड. व्हि. जे जोग यांनी काम पाहिले.