जिल्ह्यात जूनमधील सर्वात निचांकी पावसाची नोंद

अवघा सात टक्के पाऊस ; सरासरी पडतो ८०० मिमी

रत्नागिरी:– पावसाअभावी खरिपातील पेरण्या रखडल्या, असे चित्र रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच पाहायला मिळत असल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त मागील 20 वर्षांतील आकडेवारीमध्येही 22 जूनपर्यंत सरासरी पाऊस कमी राहिलेला नाही. 2009 मध्ये 104 मिमी पाऊस होता; पण त्यापेक्षा कमी नोंद झालेली नाही. जून महिन्यात सरासरी 800 मिमी पाऊस पडतो. यंदा अवघा 58 मिमी पाऊस झाला असून, तुलनेत 7 टक्केच पाऊस पडला. त्याचे परिणाम जाणवत असून पाणीटंचाईसह खरीप हंगामातील वेळापत्रक कोलमडले आहे.

ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम गेल्या 10 वर्षांमध्ये सर्वाधिक जाणवत आहे. ॠतुचक्रातील अनियमितताही याचाच एक भाग असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. सर्वाधिक सरासरी पाऊस कोकणात पडतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पावसाचे आगमन होते. तत्पूर्वी पूर्व मोसमी पावसात पारंपरिक पद्धतीने केल्या जाणार्‍या भातशेतीसाठी पेरण्या केल्या जात. हे चित्र गेल्या काही वर्षांमध्ये बिघडत आहे. सर्वाधिक पावसानंतर पुढील वर्षी कमी पाऊस पडतो. 2004 ला 851 मिमी पाऊस झाला. पुढे चार वर्षे ही सरासरी गाठता आली नाही. 2009 ला 104.2 मिमी सर्वात कमी नोंद झाली. त्यानंतर 3 वर्षांनी 2011 ला 884 आणि 2013 ला 1062 मिमी पाऊस झाला. पुढे 2021 ला आठ वर्षानंतर सरासरी गाठत 1002 मिमी पाऊस झाला. या कालावधीत पाऊस अडिचशे ते साडेसहाशे मिमीच्या दरम्यान पाऊस पडला होता. 2022 ला कमी पाऊस झाला असून, 2023 ला आतापर्यंतची सर्वात निचांकी नोंद आहे. पहिल्या आठवड्यात पूर्व मोसमी पावसानेही पाठ फिरवली आणि मोसमी पावसाची प्रतीक्षाच आहे. टंचाईची तीव्रता वाढली असून, उन्हाच्या काहिलीने माणसाच्या आरोग्यावरही परिणाम होत आहेत. खरिपातील भात, नाचणी पिकांच्या लागवडीचे वेळापत्रकच बिघडले आहे. जिथे पाणी उपलब्ध आहे तिथे सुबत्ता अशी जिल्ह्याची स्थिती आहे.