काळबादेवी-मिर्‍या पुलासाठी नऊ ठिकाणी खोदाई

माती परिक्षणासाठी घेणार चाचपणी; नमुने तपासणीनंतर निर्णय

रत्नागिरी:- रेवस-रेड्डी सागरी महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी-मिर्‍या येथील खाडीवर पूल उभारण्यासाठी माती परिक्षण केले जात आहेत. या ठिकाणी एकुण नऊ जागांवर मातीचे नमुने घेण्यात येणार आहेत. शंभर फुटापेक्षा अधिक खोल खड्डा खणून जमिनीतील मातीचा स्तर कसा आहे, याची चाचपणी केली जाणार आहे. त्यानंतर पुलासंदर्भातील निर्णय होणार आहे.

कोकणाला लाभलेल्या समुद्र किनार्‍यावरील पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाने एमएसआरडीसीच्या (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) माध्यमातून रेवस-रेड्डी हा सागरी महामार्ग बनविण्याचा निर्णय घेतला आहे. किनार्‍यावरील काही भागांमध्ये चांगले रस्ते आहेत. त्यांचे रुंदीकरण करणे, काही ठिकाणी चौपदरीकरण तर खाडींवर पूल उभारावे लागणार आहेत. त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून या रस्त्यासाठी दहा हजार कोटींची तरतूदही केली गेली आहे. जयगड ते पावस या टप्प्यात काळबादेवी आणि भाट्ये खाडीवर पूल उभारण्यात येणार असल्याची एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यात काळबादेवी-मिर्‍या या दोन गावांमधील खाडीवर पूल उभारण्यासाठी माती परिक्षण केले जात आहे. यासाठी एजन्सीची नेमणूकही केलेली आहे. आठ दिवसांपुर्वी काळबादेवी येथे बोअरवेल खोदाईचे काम सुरु करण्यात आले होते. आतापर्यंत 40 फुट खोल बोअरवेल पाडण्यात आली आहे. अजुन 100 फुट खोदाई केली जाणार आहे. यामध्ये भुगर्भातील जमीनीचा स्तर कसा आहे, कातळ आहे कींवा नाही याची चाचपणी केली जाईल. काळबादेवी येथे 3, खाडीच्या पाण्यात 3 आणि मिर्‍या येथे किनार्‍यावर तिन अशा नऊ जागांवर खोदाई करून नमुन घेण्यात येणार असल्याचे संबंधित काम करणार्‍या एजन्सीच्या ठेकेदारांनी ग्रामस्थांना सांगितले. हे काम पुढील दोन ते तीन महिने चालू राहण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात या कामांना ब्रेक लागू शकतो.