‘बागेश्री’ कासव लक्षद्वीप समुद्राकडे झेपावले

‘गुहा’चा वेग मंदावला; कर्नाटकमध्ये रेंगाळले

रत्नागिरी:- कासव संवर्धन मोहिमेतील दुसऱ्या टप्प्यात सॅटेलाईट टॅगींग केलेल्या दोन कासवांपैकी बागेश्री हे कासव केरळ किनारा ओलांडून अजून पुढे दक्षिणेकडे लक्षद्वीप समुद्राकडे वळले आहे. तर गुहा हे कासव कर्नाटक किनारपट्टी भागात मागील महिनाभरापासून तिथेच रेंगाळले आहे.

मँग्रोव्ह फाउंडेशन, महाराष्ट्र वन विभाग, भारतीय वन्यजीव संस्था यांच्या रत्नागिरी विभागाच्या संयुक्त प्रकल्पांतर्गत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रत्नागिरीतील गुहागर समुद्रकिनाऱ्यावर आणखी दोन ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रहाद्वारे टॅग करण्यात आले. दोन्ही मादी असलेल्या या कासवांना बागेश्री, गुहा अशी नावे देण्यात आली आहेत.
सदरचा प्रकल्प कासवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी, घरटे बनवण्याच्या साइटवर जाण्यासाठी, त्यांच्या प्रवासाचा मागोवा घेण्यासाठी मागील वर्षी सुरू केलेल्या संशोधन कार्र्यक्रमाचा भाग आहे. गेल्या वर्षी पाच मादी कासवांना जोडलेले ट्रान्समीटर गहाळ झ्ााले. यामुळे मँग्रोव्ह फाउंडेशन, डब्ल्यूआयआयने यंदा या दोन कासवांना सॅटेलाइट टॅग केले आहे.

सॅटेलाईट टॅगींग केलेल्या दोन कसवांपैकी बागेश्री केरळ किनारा ओलांडून अजून पुढे दक्षिणेकडे वळली आहे. ती तेथील महाद्वीपीय शेल्फ पाण्यात गेली आहे. बागेश्री सातत्याने मार्गक्रमण करताना दिसत आहे. लवकरच ती अरबी समुद्र मागे सोडून लक्षद्वीप समुद्रात प्रवेश करेल.

दुसरीकडे गुहा त्याच भागात कायम आहे. गुहा कर्नाटक किनारपट्टीच्या खोल पाण्यात शिरली आहेत. हळूहळू दक्षिणेकडे जात आहे. मात्र तिचा मार्गक्रमण करण्याचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यापासून गुहा त्याच भागात रेंगाळत आहे.