रत्नागिरी तालुक्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी एसटी बंद

उध्दव ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी घेतली एसटी अधिकार्‍यांची भेट

रत्नागिरी:- तालुक्यातील अनेक गावांमधील एसटी बसेस अनेक दिवस बंद असून ग्रामस्थांची गैरसोय होत आहे, त्यातच आता शाळा व महाविद्यालये सुरु झाल्याने विद्यार्थ्यांचेही हाल होऊ लागले आहेत. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी एसटी अधिकार्‍यांची भेट घेऊन बसेस तातडीने सुरु करण्याची मागणी केली.

रत्नागिरी तालुक्यात भोके, मिरजोळे, कुर्धे, मेर्वी, डोर्ले, तोणदे भागातील गाड्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. भारमान कमी असल्याने या गाड्या बंद असल्याचे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. विशेषत: अनेक गाड्या या कोरोनानंतर बंद झाल्या आहेत काही बसेस या एसटी कर्मचार्‍यांच्या संपानंतर सुरुच झाल्या नाहीत. अनेकवेळा ग्रामस्थांनी एसटी अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतरही बसेस सुरु झालेल्या नाहीत. त्यातच राज्य शासनाने महिलांना 50 टक्के तिकीटामध्ये सवलत दिल्यानंतर एसटीतून प्रवास करणार्‍या महिलांची संख्याही लक्षणिय वाढली आहे. परंतु ग्रामीण भागामधून सकाळी शाळा, कॉलेजच्या वेळेत सुटणार्‍या गाड्या अद्याप बंद असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांच्याकडे गावभेटी दरम्यान अनेक ग्रामस्थांनी बसेसचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे खा. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख बंड्या साळवी, माजी जि.प. अध्यक्ष जयसिंग घोसाळे, उपतालुकाप्रमुख शेखर घोसाळे, युवासेना तालुकाधिकारी प्रसाद सावंत, विभागप्रमुख विजय देसाई यांच्यासह विविध गावातील सरपंच व ग्रामस्थांनी एसटी विभाग नियंत्रकांची भेट घेतली आणि एसटी बसेस सुरु करण्याबाबत चर्चा केली. यावेळी शाळेत जाण्यासाठी निघणार्‍या गाड्या सुरु करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे अधिकार्‍यांनी यावेळी आश्वासन दिले.