जाळ्यात अडकून जखमी झालेल्या कासवाला जीवदान

रत्नागिरी:- शहराजवळील भाट्ये किनारी जाळ्यात अडकून जखमी झालेल्या कासवाला कोकण रेेल्वेेचे तिकिट तपासणीस व प्राणीमित्र विवेक नलावडे यांनी जीवदान दिले. कासवाची जाळ्यातून सुटका करून पाण्यात सोडण्यात आले.

कोकण रेल्वेमध्ये तिकिट तपासनीस असलेले नलावडे हे शुक्रवारी (ता. 16) सायंकाळी रत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनारी फिरण्यासाठी गेले होते. त्यांना झरी विनायक मंदिराच्या बाजूला किनार्‍यावर जाळ्यामध्ये काहीतरी हालचाल करताना दिसत होते. उत्सुकता म्हणून श्री. नलावडे यांनी जाळ्याच्या जवळ जाऊन पाहिले. त्यामध्ये एक कासव अडकलेले होते. समुद्राच्या लाटांबरोबर कासव जाळ्यात अडकून वाहत किनार्‍यावर आले असावे असा अंदाज त्यांनी बांधला. नलावडे यांनी ते मासेमारीचे जाळे कापले आणि अडकलेल्या कासवाची सुटका केली. ते उचलून पुन्हा समुद्राच्या पाण्यात सोडले. जागतिक सागरी कासव दिनाच्या दिवशी त्यांनी हे कार्य केले.