रत्नागिरी जिल्ह्याला मिळाले पाच नवे पोलीस निरीक्षक

बढती नंतर राजेंद्र यादव पुन्हा रत्नागिरीत

रत्नागिरी:- गृह विभागाने राज्यातील ४४९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून रत्नागिरी जिल्ह्यात पाच नव्या पोलीस निरीक्षकांची बदली झाली आहे. राज्य सरकारने यावर्षी बदल्या करताना साईट ब्रांच मध्ये कार्यरत असलेल्या अनेक पोलीस निरीक्षकांना जिल्हा,महानगरात शहरात नियुक्त केले आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्र, राज्य गुप्तवार्ता विभाग येथे ठाण मांडून बसलेल्या पोलीस निरीक्षकांना आता पोलिस स्थानकातून काम करावे लागणार आहे.

पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याला पाच नूतन पोलीस निरीक्षक मिळाले आहेत. त्यामध्ये रत्नागिरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून उत्तम काम केलेले राजेंद्र शंकरराव यादव यांची पोलीस निरीक्षक म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात बदली झाली आहे. ते सध्या लोहमार्ग मुंबई येथे कार्यरत आहेत. ठाणे शहर येथून वैभव विजय धुमाळ, पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथून स्मिता शंकर सुतार, मुंबई शहर येथून महेश महादेव तोरसकर, ठाणे शहरातून सचिन वसंत सावंत यांची नियुक्ती जिल्ह्यात करण्यात आली आहे. गृह विभागाच्या दोन्ही यादीत रत्नागिरीतील एकाही पोलीस निरीक्षकाची जिल्हा बाहेर बदली करण्यात आलेली नाही.

नव्याने बदली झालेले पोलीस निरीक्षक जिल्ह्यात रुजू झाल्यानंतर जिल्हा अंतर्गत पोलीस निरीक्षकांच्या बदल्या कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्या मान्यतेने होणार आहेत. त्यामुळे नव्या नियुक्त्यांमध्ये रत्नागिरी शहर, चिपळूण शहर, खेड शहर येथे कोणाची वर्णी लागते याकडे पोलीस दलाचे लक्ष लागले आहे.