विद्यार्थ्यांची स्वारी चारचाकी वाहनातून; जिल्ह्यात पहिल्याच दिवशी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

रत्नागिरी:- नव्या शैक्षणिक 2023-24 या वर्षाचा गुरूवारपासून आरंभ झाला. या प्रवेशोत्सवाचा जणू उत्सव साजरा झाला. जिल्ह्यातील सर्व विद्यामंदिरे पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेली. ढोल-ताशांच्या गजरात अगदी मोठ्या डामडौलाच्या उत्साही वातावरणात यादिवशी जिल्ह्यात 2 हजार 494 प्राथमिक शाळांमध्ये 10 हजार 952 नवागतांचे पहिलीच्या वर्गात स्वागत करण्यात आले.

15 जूनपासून शैक्षणिक सत्राला प्रारंभ झाला. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागतांच्या स्वागतासाठी सर्व शाळांची स्वच्छता, साफसफाईची कामे अगोदरच उरकून घेण्यात आलेली होती. शाळा प्रवेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक शाळेतील वातावरणही अगदी आनंदमयी करण्यात आले होते. मुलांच्या स्वागतासाठी शाळांच्या दरवाजाला आकर्षक फुले, फुगे, यांनी कमानी सजवण्यात आल्या होत्या. अगदी फुलांच्या प्रतिकृतीचे सेल्फीपाँईटही काही शाळांमध्ये तयार करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शाळेत आकर्षक सजविलेल्या कुठे कारगाड्यांमधून आणण्यात आले. विद्यार्थ्यांचे व त्यांच्यासोबत आलेल्या पालकांचेही गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येत होते.

शहरीभागांसह, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी त्यांच्या वाजत-गाजत मिरवणूकाही काढण्यात आल्या. शहरातील शाळांमध्ये त्यांच्या मुख्य गेटवर विद्यार्थी येताच स्वागत केले जात होते. पण ग्रामीण भागात हे चित्र काहीसे वेगळे होते. तेथील ग्रामस्थांच्या सहकार्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूका म्हणजे शाळा प्रवेशोत्सव दिंडी काढण्यात आल्या. विद्यार्थ्यांना आणण्यासाठी चारचाकी गाड्या फुले, फुगे अशा वस्तूंनी सजवून त्यातून विद्यार्थी आणण्यात आले. त्या मिरवणूकीत शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक, लोकप्रतिनिधींचाही सहभाग दिसून आला.

पहिल्या दिवशी नवे दप्तर, नवा शालेय पोषाख, नवी पुस्तके, साहित्य, अशा वातावरणात विद्यार्थ्याचा अनोखा साज होता. त्यावेळी अनेक मुलांचे पालकही सोबत शाळांमध्ये आलेले होते. विद्यार्थ्यांबरोबर पालकांचीही शाळांमध्ये यादिवशी गर्दी झालेली होती. जणू नव्या शैक्षणिक वर्षांच्या स्वागताचा शाळांशाळांमध्ये उत्सव साजरा झाल्याचा पत्यय गुरूवारी साऱया जिल्हाभर आला. या शाळा पवेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात 1 ली ते 8 वी मध्ये शिकणाऱया 1 लाख 16 हजार 341 लाभार्थ्यांना 4 लाख 83 हजार 997 पाठपुस्तके वितरण करण्यात आली. 100 टक्के पटनोंदणी, 100 टक्के उपस्थिती, गळतीचे पमाण शुन्यावर आणण्यासाठी शिक्षण विभागामार्फत उपाययोजना आखण्यात येत आहेत. मोफत गणवेश योजनेंतर्गत जिल्ह्यातील 51 हजार 381 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे.शाळेच्या पहिल्या दिवशी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समितीमधील सर्व खात्याचे अधिकारी, समग्र शिक्षाकडील सर्व कर्मचारी, पर्यवेक्षीय अधिकारी यांचे शाळा प्रारंभदिनी शाळा भेटीसाठी जिल्हाभरातील ठिकठिकाणच्या शाळांमधून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत मुलांचे स्वागत करण्यात आले. शाळांमध्ये ‘शैक्षणिक पालखी’ ची मिरवणूक काढून शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात आले. यादिवशी मोफत पाठ्यपुस्तक वितरणाबरोबरच मुलांचे फुले व खाऊ देऊन स्वागत केले. शालेय पोषण आहार योजनेंतर्गंत गोडपदार्थाचे वाटप करण्यात आले. प्रभातफेरीमध्ये स्वागत मुलांबरोबर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ, यांनाही सहभागी करून घेण्यात आले होते.