जिल्ह्यातील 161 शाळा शून्य शिक्षकी; गुरुजींविना शाळा बंद होण्याची भीती

रत्नागिरी:- जिल्ह्यातील 725 हून अधिक शिक्षकांच्या सरसकट आंतरजिल्हा बदली केल्यामुळे यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील 161 शाळांमध्ये एकही शिक्षक शिकवण्यासाठी उपलब्ध होणार नाही. पुर्वी पटसंख्या नाही म्हणून शाळा बंद पडत. आता गुरुजी नाहीत म्हणून शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे. शून्यशिक्षकी शाळांची संख्या 161 वर पोहोचल्यामुळे त्या शाळेतील शिक्षणाचा बट्ट्याबोळ होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांच्या सरसकट आंतरजिल्हा बदली केल्यामुळे जिल्ह्यात शिक्षकांच्या सुमारे 1752 जागा रिक्त आहेत.

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीमुळे शिक्षकाविना शाळा ओस पडणार आहेत. जिल्ह्यामध्ये 161 शाळा शून्यशिक्षकी शाळा ठरणार आहेत. त्यामुळे मंडणगड तालुक्यात 8 शाळा शून्यशिक्षकी शाळा आहेत. मंडणगड तालुक्यामध्ये शिक्षकांची 420 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 96 पदे रिक्त असून 60 जणांची आंतरजिल्हा बदली झाली. दापोली तालुक्यामध्ये शिक्षकांची 805 मंजूर पदे आहेत. त्यापैकी 253 पदे रिक्त आहेत. 87 शिक्षकांची आंतरजिल्हा बदली करण्यात आली. जिल्ह्यात 22 शाळा शून्यशिक्षकी शाळा ठरल्या आहेत. खेड तालुक्यात 961 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 228 पदे रिक्त आहेत. 93 शिक्षकांची बदली करण्यात आली. एकूण 20 शाळा शून्यशिक्षकी शाळा ठरल्या आहेत. गुहागर तालुक्यात 607 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 199 पदे रिक्त आहेत. 79 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. 17 शाळा शून्यशिक्षकी ठरल्या आहेत. चिपळूण तालुक्यात 1001 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 141 पदे रिक्त आहेत. 70 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. 8 शाळा शून्यशिक्षकी ठरल्या आहेत. संगमेश्वर तालुक्यामध्ये 1015 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 287 पदे रिक्त आहेत. 99 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. एकूण 28 शाळा शून्यशिक्षकी ठरल्या आहेत. रत्नागिरी तालुक्यात 1001 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 136 पदे रिक्त आहेत. 65 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. 14 शाळा शून्यशिक्षकी ठरल्या आहेत. लांजा तालुक्यामध्ये 632 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 161 पदे रिक्त आहेत. 60 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. 23 शाळा शून्यशिक्षकी ठरल्या आहेत. राजापूर तालुक्यामध्ये 954 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 251 जागा रिक्त आहेत. 112 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. सध्या 21 शाळा शून्यशिक्षकी ठरल्या आहेत.

पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार
राज्य सरकारने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करुन विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान केले आहे. सिंधुदुर्गात 121 शाळा आणि रत्नागिरीमध्ये 161 शाळा शून्यशिक्षकी शाळा ठरल्या आहेत. या शाळा सुरु होताच या शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास सिंधुदुर्गामध्ये पालकमंत्री दीपक केसरकर आणि रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या घरासमोर आंदोलन करू, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.