साखरपा:- रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील कोंडगाव येथील शिंदेवाडी जवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी व तवेरा गाडीची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली.
मिळालेली माहितीनुसार दुचाकीस्वार गणेश शेटकर
आपल्या ताब्यातील ज्युपिटर दुचाकी गाडी ( जी. ए. ११ जे. ३२६७ ) गोव्यावरून कोल्हापूर मार्गे गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी पत्नीसह जात असताना रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील कोंडगाव शिंदेवाडी जवळ आले असता समोरून येणारी तवेरा गाडी( एम. एच. ११ इ. इ. ३०३३ ) यांच्यात जोरदार धडक बसून झालेल्या अपघात दुचाकीस्वार जागीच ठार झाले. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या सुमित्रा गणेश शेटकर वय ३७ या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर अधिक उपचारासाठी पुढे हलविण्यात आले आहे.
अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक रहिवासी मदतीसाठी धावून आले तर साखरपा दूर क्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव पोलीस नाईक वैभव कांबळे तानाजी पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरू केली आहे.