माझी वसुंधरा अभियान; रत्नागिरी पालिकेला दीड कोटीचे बक्षिस

रत्नागिरी:- स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशपातळीवर नाव कमवलेल्या रत्नागिरी पालिकेने कोकण विभागात पुन्हा चमकदार कामगिरी केली आहे. माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत ५० हजार ते १ लाख लोसंख्येच्या संवर्गामध्ये विभागीय स्तरावर पहिला क्रमांक पटकावला आहे. पर्यावरण दिनी पालिकेचा गौरव झाला असून १ कोटी ५० लाखाचे बक्षिस मिळाले.

विशेष म्हणजे पंचतत्व या विभागात वर्षभरात केलेल्या कामगिरीचा हा सन्मान झाला. पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक तुषार बाबर, माने, चाळके यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी झोकून काम केल्याचे हे फलित आहे. यापूर्वी देखील पालिकेला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पालिकेला पुरस्कार मिळला होता. आता स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशपातळीवर रत्नागिरी पालिकेचे नाव झाले. या कामगिरीमध्ये देशातील २५ सुंदर शहरांमध्ये रत्नागिरी पालिकेचे नाव होते.

शासनाकडून गेल्या वर्षी माझी वसुंधरा अभियान ३.० राबवण्यात आले. या अभियानामध्ये पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्वअंतर्गत केलेल्या कामाचे मुल्यांकन करण्यात आले. त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापन, वृक्ष लावगड, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरात ४ पॉईंट ठेवण्यात आले. सोलार पॅनेलला प्रोस्ताहन देण्यात आले. वृक्षगणना केली. मोठ्या खोडाच्या झाडांना टॅग लावला आला आहे. ग्रीन एरिया तयार करून सेल्फि पॉइंटर तयार केले. शहरात नवीन बिल्डिंगला परवानगी देताना रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केले. पर्यावरकपूरक आणि प्रदूषणमुक्त दिवाळीचे आवाहन केले. गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जनासाठी सार्वजनिक तलाव तयार करून प्रदूषण टाळण्यात आले. पालिकेने केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विभाग स्तरावर रत्नागिरी पालिकेने माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत विभागीय स्तरावर पहिला क्रमांक मिळवला असून, दीड कोटीचे बक्षिस शासनाने दिले आहे.

हरित क्षेत्र वाढवण्याचा पालिकेचा संकल्प

जागतिक पर्यावरणदिनानिमित्त रत्नागिरी पालिकेकडून मंगळवार आठवडा बाजार येथे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी उपमुख्याधिकारी प्रवीण माने, उद्यान पर्यवेक्षक विनित यादव, इंद्रजित चाळके, संतोष जाधव, संतोष कदम, शुभम यादव, मकरंद पावसकर, नरेश आखाडे व इतर कर्मचारी या वेळी उपस्थित होते. वृक्ष लागवड करून हरित क्षेत्र वाढवण्याचा या वेळी संकल्प सोडण्यात आला.

माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत रत्नागिरी पालिकेला विभाग स्तरावर पहिला पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कारांतर्गत दीड कोटीचे बक्षिस मिळाले आहे. यामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी आदींचे मोठे योगदान आहे.

-तुषार बाबर, पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक, रत्नागिरी