जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी गोळा केला साडेआठ हजार किलो प्लॅस्टीक कचरा

रत्नागिरी:- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतींमार्फत प्लॅस्टीकमुक्त रत्नागिरी’चा संदेश देत अभियान राबवण्यात आले. यातून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधून जवळपास साडेआठ हजार किलोहून अधिक प्लॅस्टीक कचरा गोळा करण्यात आला. समुद्रकिनार्‍यापासून रस्ते व गल्ल्यांमधूनही प्लॅस्टीकमुक्तीचा संदेश घराघरात देण्यात आला.

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या संकल्पनेतून ही मोहीम हाती घेण्यात आली होती. यासाठी प्रत्येक पंचायत समिती, ग्रामपंचायतींमार्फत बैठका घेऊन सूचनाही देण्यात आल्या. पर्यावरण स्वच्छतेचा संदेश काळाजी गरज बनली आहे. समुद्रकिनार्यासह सह्याद्रीच्या पट्ट्यामध्येही मोठ्याप्रमाणात प्लॅस्टीक बॉटलचा वापर आढून आला आहे. त्याचा परिणाम थेट सागरी जैवविविधता आणि सह्याद्रीच्या निसर्गावरही होताना दिसत आहे. रस्त्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणात प्लॅस्टीक बाटल्याही आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यकार्यकारी अधिकार्यांनी राबवलेली मोहीम कौतुकाचा विषय बनली आहे.

ग्रामपातळीवर सर्वानी सहभागी व्हावे म्हणून, घटनास्थळाच्या स्वच्छतेचे फोटो तात्काळ जिल्हा परिषदेकडे मागवण्यात आले होते. या मोहिमेचा चांगला परिणाम दिसून आला असून जिल्ह्यात जिल्ह्यात 8 हजार 692 किलो कचरा गोळा करण्यात आला आहे. ज्या भागात नियमित कचरा टाकण्यात येतो, त्या ठिकाणी आता ग्रामपंचायतींनी कचरा टाकू नये असे फलकही लावले आहेत. चिपळूण, गुहागरमधील काही ग्रामपंचायतींनी तर प्लॅस्टीक कचर्यासाठी जाळीचे बॉक्स तयार केले असून, त्यामध्ये प्लॅस्टीक टाकण्याचे आवाहन केले जात आहे. ग्रामपंचायतींचा हा उपक्रमही कौतुकास्पद ठरला आहे.
जिल्ह्यात गोळा झालेला कचरा दोन भागात विभागण्यात आला आहे. यामध्ये मंडणगड, दापोली, खेड, गुहागर व चिपळूणमधील कचरा खडपोली येथील अमर इंडस्ट्रीजकडे तर राजापूर, लांजा, रत्नागिरी व संगमेश्वरमधील कचरा झाडगाव एमआयडीसीतील मलुष्ट्ये सी अर्थ यांच्याकडे पुर्नप्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी सीईओ किर्ती किरण पुजार, जिल्हा ग्रामीण यंत्रणा प्रकल्प संचालक श्रीमती नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत आवळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच, ग्रामविकास अधिकारी व सदस्यांनी सहभाग घेतला.