किनारपट्टी भागात लाटांचे तांडव कायम

रत्नागिरी:- बिपरजॉय वादळ कोकण किनारपट्टीवरून पुढे सरकले असले तरी वादळाचा परिणाम किनारपट्टीवर जाणवत आहे. रत्नागिरीच्या मांडवी, मिऱ्या किनारपट्टीवर अजस्त्र लाटा धडकत आहेत. लाटांचा वेग वाढला असून शुक्रवारी मध्यरात्री रत्नागिरीत पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कोकण किनारपट्टीवर बिपरजॉय वादळ धडकण्याची शक्यता होती. परंतु खोल समुद्रातून वादळ पुढे सरकल्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. वादळा परिणाम किनारपट्टीवर मात्र जाणवत आहे. मच्छीमारांनी आपल्या नौका बंदरात उभ्या केल्या आहेत. परंतु अजस्त्र लाटांच्या तडाख्यामुळे नौका बंदरातही हेलकावे खात आहेत.

मिऱ्या समुद्रकिनाऱ्यावर लाटा उसळण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. किनाऱ्यावर सुरू असलेल्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यामुळे उंच उसळणाऱ्या लाटा रोखल्या जात आहे. परंतु पावसाळ्यात लाटांचे पाणी मानवी वस्तीत येण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी मध्यरात्री रत्नागिरी शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळी पाऊस पडण्यासारखे वातावरण निर्माण झाले होते. परंतु काही वेळातच तडाख्याचे ऊन पडले. शनिवारी दिवसभर कडाक्याचे ऊन होते. परंतु वाऱ्याचा वेग वाढलेला असल्याने उष्म्यापासून मात्र रत्नागिरीकरांना दिलासा मिळाला.