रत्नागिरीत २६ वाड्यांतील २२,१२५ वस्तीला टँकरचा आधार

रत्नागिरी:- तालुक्यातही ग्रामीण भागातील गाव आणि वाड्यांना जोरदार पाणीटंचाईची झळ बसली आहे. तालुक्यातील ७ गावांमधील २६ वाड्यांमधील २२ हजार १२५ जणांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ३ गावांची वाढ झाली आहे. तालुक्यातून आणखी काही गावांना टंचाई भासत असून, या टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेकांचे घसे या टंचाई स्थितीमध्ये कोरडे आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील सडामिऱ्या यथील चौसापावाडी, मधलावठार, गवाणवाडी, खालचावठार, शिंदेवाडी, आनंद नगर या गावांना, नवा सोमेश्वरमध्ये पाळंदवाडी, गोळपमधील मुसलमानवाडी, हनुमानवाडी, डोंगरेवाडी, सुतारवाडी, परशुरामवाडी, वरवडे येथील खारवीवाडा, भंडारवाडा, मराठवाडा आणि वरवडे या चार गावांतील १६ टंचाईग्रस्त वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. या वाड्यांमधील 22 हजार १२५ जणांना या टंचाईच्या झळा बसत आहेत. शासकीय एकही टॅंकर वाड्यांमध्ये जात नाही; मात्र खासगी टॅंकरद्वारे या वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. आतापर्यंत ५ टॅंकरच्या या वाड्यांमध्ये ३८० फेऱ्या झाल्या आहेत. गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांच्याशी संपर्क साधला असता या आठवड्यात टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ झाली आहे. उक्षी, गावडेआंबेरे आणि केळ्ये गावांची भर पडली आहे. त्यामुळे आणखी वाड्या टंचाईग्रस्त भागात वाढल्या आहेत. त्याची पाहणी करण्यासाठी बीडीओ जाधव केळ्येमध्ये आढावा घेत आहेत. टंचाईग्रस्त गावे, वाड्या आणि बाधितांची संख्याही वाढणार आहे. तालुक्यातून अन्य गावांनाही पाणीटंचाई भासत आहे; परंतु त्यांना पाणी पुरवण्यासाठी टॅंकर उपलब्ध नाहीत. त्यामुळे या वाड्यांची तहान कशी भागवायची, असा गंभीर प्रश्न आता जिल्हा प्रशासनापुढे आहे.

तालुक्यात पाणीटंचाई भासणाऱ्या गावांमध्ये वाढ झाली आहे. अजूनही मागणी वाढत आहे; परंतु आता या गावांना आणि वाड्यांना पाणी पुरवठा करण्याचा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे. जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून यातून आम्ही मार्ग काढत आहे.

  • जे. पी. जाधव, गटविकास अधिकारी रत्नागिरी