भाट्ये खाडीतील गाळ काढण्यासाठी पावसाळ्यानंतरचा मुहूर्त

रत्नागिरी:- भाट्ये खाडीच्या मुखाशी साचलेल्या गाळामुळे मच्छिमारांना संघर्ष करावा लागत आहे. याबाबत जमातुल मुस्लिमीन राजिवडा’ कोअर कमिटी पुरस्कृत मच्छिमार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. 5) जनता दरबारात पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर समस्या मांडली. त्यांनीही भाट्ये खाडीतील गाळ काढण्यास पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यात सुरु करणार असल्याचे सांगितले.

भाट्ये खाडीच्या परिसरातील राजिवडा. कर्ला. भाट्ये. फणसोप, जुवे येथील मच्छिमारांना समुद्रात जाण्यासाठी मांडवी बंदराचे मुख हा एकमेव मार्ग आहे. भाट्ये खाडीचे मुख असलेले मांडवी बंदरासह संपूर्ण खाडी परिसर गाळाने भरला आहे. त्यामुळे मच्छिमारांना भविष्याची चिंता सतावत आहे. त्यासाठी भाट्ये खाडीचे मुख असलेले मांडवी बंदरात साचलेला खाडी परिसरातील गाळ काढल्यास मच्छिमारांची मोठी समस्या दूर होणार आहे. त्याबाबत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा मच्छिमारांच्या वतीने शासनाला निवेदने देऊन गाळ उपशाची मागणी केली होती. परंतु हा गाळाचा प्रश्न शासनाने गांभिर्याने न घेतल्याने आज जैसे थे आहे. त्यामुळे भविष्यात मच्छिमारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासाठी मच्छिमार संघर्ष समिती लढा देत आहे. त्यासाठी मच्छिमार संघर्ष समितीचे पदाधिकाऱ्यांनी गेल्याच आठवड्यामध्ये मुंबईतील महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन गाळाची समस्या सोडविण्याबाबत चर्चा केली होती. जनता दरबारामध्ये संघर्ष समितीचे अध्यक्ष नजीर वाडकर. दरबार वाडकर. शब्बीर भाटकर, जहूर बुड्ये, इमान सोलकर, फकीर मिरकर, रहिम दलाल व अन्य पदाधिकाऱ्यांनी गाळाची समस्या मांडण्यासाठी उपस्थित होते. त्यांनी पालकमंत्र्यांसमोर भाट्ये खाडीच्या मुखाशी साचलेल्या गाळाचा प्रश्न पालकमंत्र्यांसमोर मांडला. त्यावेळी पालकमंत्र्यांनी भाट्ये खाडीतील गाळ उपशाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. त्यासाठी पावसाळ्यानंतर पुढील मासेमारी हंगामात ऑक्टोबर महिन्यापासून गाळ उपशाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन दिले.