आरटीई अंतर्गत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 557 जागांचे प्रवेश निश्चित

रत्नागिरी:- शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 557 जागांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. आता प्रतीक्षा यादीतील बालकांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीच्या कागदपत्रांची तपासणी करण्याची 12 जूनपर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेत प्रवेश निश्चित करण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ देऊनही प्रवेशाची गती संथच असल्याचे दिसून आले आहे. अद्यापही 30 हजार 833 जागा रिक्त राहिल्या आहेत. आता लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळणार नसल्याने प्रतीक्षा यादीवर असणार्‍या विद्यार्थ्यांना आरटीईची लॉटरी लागणार आहे.
जिल्ह्यात 928 जागा होत्या. त्यापैकी 726 जणांना लॉटरी लागली होती. त्यापैकी 557 जणांनी प्रवेश घेतला आहे. यामुळे अजूनही 371 जागा रिक्तच आहेत. प्रवेश निश्चित करण्यासाठी आतापर्यंत तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र, प्रवेशाची गती संथच असल्याचे वारंवार दिसून आले आहे. पालकांना सोयीची शाळा मिळत नसल्याने प्रवेश निश्चित केले जात नाहीत. त्यामुळे जागा रिक्त आहेत.
निवड यादीतील विद्यार्थ्यांची मुदत संपल्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू केले जाणार आहेत. प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांना एसएमएस पाठवण्यात आला आहे. या बालकांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 12 जूनपर्यंत पंचायत समिती स्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन नमूद केलेले मूळ कागदपत्र तपासणी करून घ्यावेत. असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले आहे.