हंगामाच्या शेवटी देखील हापूस सर्वसामान्यांच्या हाताबाहेर

रत्नागिरी:- पावसाळा जवळ आला तरी सर्वसामान्यांना अद्यापही ‘हापूस’ आवाक्यात आलेला नाही. सध्या फळाच्या आकारमानानुसार हापूसची पेटी 1500 ते 2000 च्या घरात असून यावर्षी हापूस प्रेमींना तो मनसोक्त खाता आलेला नाही. आधीच कमी असलेला हापूस हंगामाच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत असून, येत्या सात ते आठ दिवसात हंगामाची अखेर होणार आहे.

लहरी हवामान, अवेळी पाऊस, उन्हाची वाढलेली काईली यामुळे गतवर्षीच्या तुलनेत हापूसचा हंगाम 10 ते 15 टक्केच राहिला. हापूस झाडाला फुलोरा येऊनही त्याला अवेळीच्या फटक्यामुळे फळधारणा झालीच नाही. त्यामुळे दरवर्षी जानेवारीपासून सुरु होणारा हापूसचा हंगाम यंदा फेब्रुवारीच्या दुसर्‍या पंधरवड्यात सुरु झाला. पहिल्यापासूनच हापूसची पेटी चढ्या भावाने विकली जात होती. अगदी एप्रिलमध्ये आंब्याचे दर बर्‍यापैकी उतरण्यास सुरुवात होतात. गुढीपाडव्याच्या दरम्या लाखो पेट्या मुंबईला दाखल होत असतात. पिकलेला हापूसही मोठ्या प्रमाणात याचवेळी पुणे, कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यात व परराज्यातही जात असतो. मात्र यावर्षी गुढीपाडव्यालाच जेमतेम 30 ते 35 हजार पेट्या मुंबई मार्केटला दाखल झाल्या होत्या. त्यामुळे हापूसचे दर उतरणीचे नाव घेत नव्हते.

अगदी रत्नागिरीतही तयार झालेला हापूस 20 मे पर्यंत 500 ते 700 रुपये प्रती डझन दरानेने विकला जात होता. छोट्या आकाराचा हापूस साडेतीनशे ते पाचशे दरम्यान उपलब्ध होत होता. मेच्या अखेरीस हापूसचे भाव कमी होतील, अशी शक्यता सर्वसामान्यांकडून व्यक्त होत होती. परंतु अखेरीसह दोन डझनचा कच्च्या हापूसचा खोका सहाशे ते सातशे रुपयांनी विकला जात होता. पेटीचा दर तर हापूसच्या आकारानुसार दीड हजार ते दोन हजार रुपये मुंबई मार्केटला विकला जात आहे. मेच्या शेवटच्या आठवड्यातही हा दर कायम आहे.

सध्या अनेक बागायतदारांकडून नेपाळी गुरखेही आंबा हंगाम संपत आल्याने गावी परतू लागले आहेत. त्यामुळे स्थानिक कामगारांना हातशी धरुनच बागायतदार आंब्यावरील शेवटचा ’हात’ मारत आहेत. या बागायतदारांकडून नेपाळी कामगार माघारी परतले आहेत, त्यांच्याच बागातील आंबा काढायला आणखी पाच ते सहा दिवस लागणार असल्याने जूनच्या पहिल्याच आठवड्यात हापूसचा हंगाम संपणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आजही हापूस महागच राहिला असून, मनसोक्त खाल्लेला नाही. त्यामुळे शेवटच्या आठवड्यातील दरही चढेच राहण्याची शक्यात विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

हापूसप्रमाणेच पायरी आंब्यालाही मागणी असून, हा आंबाही यंदा कमी प्रमाणातच बाजारपेठेत उपलब्ध झाला. त्यामुळे हापूस इतकेच दर पायरीलाही मिळाले. बाजारपेठेतून यंदा पायरीही लवकरच गायब झाल्याचे पहायला मिळत आहे.