दापोलीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाकडून सुटका

दापोली:- कोंढे गोरीवले वाडीतील विहीरीत बिबट्या पडला. विहिरीत पडलेल्या बिबटयाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न करून सुखरूपपणे बाहेर काढत सुटका केली.

दापोली तालूक्यातील कोंढे गोरीवले वाडी येथील शांताराम अर्जुन पिरजानकर यांच्या मालकीच्या सर्व्हे नंबर 10/10 या जमिनीतील विहीरीत बिबटया पडला असल्याची माहीती दापोली वन विभागाला देण्यात आली त्यानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जावून 3 तास अथक प्रयत्न करत 40 फुट खोल असलेल्या विहीरीतून बिबटयाला सुखरूप विहीरीबाहेर काढले. त्यानंतर दापोली येथील वन विभागाच्या रोप वाटीकेत आणून पशु वैदयकिय अधिकारी यांच्याकडून बिबटयाची वैदयकिय तपासणी करण्यात आली. त्यानंतर नैसर्गिक अधिवासात बिबटयाला सुखरूपणे सोडण्यात आले.

सदरचा बिबट्या हा नर जातीचा असून अंदाजे दीड ते दोन वर्ष वयाचा असल्याचे प्राथमिक तपासणीमध्ये निदर्शनास आले. विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू ओपरेशन सुरक्षित पार पडले. सदर कामगिरीसाठी दापोली परिक्षेत्र वन अधिकारी पी. जी. पाटील, दापोली वनपाल साताप्पा सावंत, मंडणगडचे वनपाल अ. रा. दळवी, खेडचे वनपाल सु. आ. उपरे , बांधतिवरे वनरक्षक जळणे, ताडीलचे वनरक्षक भिलारे, खेडचे वनरक्षक जगताप, कोंगळेचे वनरक्षक शुभांगी गुरव, पालघरचे वनरक्षक वि.द.झाडे, काडवली वनरक्षक ढाकणे, खवटी वनरक्षक रा.प. बंवर्गेकर आदी अधिकारी कर्मचाऱ्यांसह स्थानिक ग्रामस्थांनी तसेच सर्पमित्र संघटनेच्या सभासदांनी मेहनत घेतली.