संगमेश्वर तालुक्यातील तहानलेल्या वाड्यांना तात्काळ पाणी पुरवठा करा: ना. सामंत

रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील तहानलेल्या वाड्यांना तात्काळ पाणी पुरवठा करा असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला दिले आहेत. सोशल मिडीयावर पाण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केल्याची माहिती मिळाल्यानंतर मंत्री सामंत यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना बोलावून आढावा घेत सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील कोणी व्यक्ती पाण्यापासून वंचित राहिल्याची तक्रार आल्यास योग्य ती कारवाई करणार असल्याचे संकेत पालकमंत्री यांनी दिले आहेत.

संगमेश्वर तालुक्यातील उमरे धरणातील पाणीसाठा संपल्याने प्रादेशिक नळपाणी योजना बंद पडली आहे. त्यामुळे या योजनेवरील दहा गावांचा पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. या धरणावर अवलंबून असलेल्या गावातील लोकांनी सोशल मिडीयावर मदतीची साद घातली होती. पावसाळ्यात दीडशे इंच पाऊस आणि उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे वर्णन ग्रामस्थांनी केले होते. टंचाईग्रस्त गावांना सरकारी पातळीवरून टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. पण तो पुरेसा नाही. मग खासगी टॅंकर मागवावे लागतात. पाच हजार लिटरच्या एका टॅंकरसाठी चार ते साडेचार हजार रुपये दर आहे. ४०-५० घरांच्या वाडीला हे पाणी दोन दिवस पुरते. ते संपलं की कुठून तरी पुन्हा पैसे गोळा करायचे. काही वेळा दोन-दोन किलोमीटरवरुन पाण्याचे हांडे आणावे लागत आहेत. कोंडउमरे धरण परिसर क्षेत्रातील ही परिस्थिती मांडत मदतीचे आवाहन केले होते. याची गंभीर दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी रत्नागिरीत अधिकाऱ्यांना बोलावून संगमेश्वर येथील पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. पाच दिवस आड नको, तर रोज पाणी पुरवठा करा अशे त्यांनी सांगितले. पाण्यापासून कोणीच वंचित राहता कामा नये, याचे नियोजन करण्याची जबाबदारी प्रत्येक तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे आहे. कोणी व्यक्ती पाण्यापासून वंचित राहिल्यास अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल असे संकेत पालकमंत्री यांनी दिले आहेत.