मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 25 हजार जणांना मिळणार शासन आपल्या दारी योजनेचा लाभ

ना. उदय सामंत : शासकीय इंजिनिअरींग कॉलेजला स्व. शामराव पेजेंचे नाव

रत्नागिरी:- ‘शासन आपल्या दारी’ योजनेच्या निमित्ताने जिल्ह्यातील 90 हजार लाभार्थ्यांना दाखले व विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यातील तब्बल 25 हजार जणांना 25 मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये योजनांचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. पावसाळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 55 जिल्हा परिषद गटात शासनातर्फे आरोग्य शिबीर आयोजित केली जाणार असल्याचेही ना. सामंत यांनी यावेळी सांगितले.

मंगळवारी दिवसभरात दापोली, चिपळूण व रत्नागिरी येथे नऊ तालुक्यातील विविध योजना व लाभर्थ्यांचा आढावा पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ना. सामंत म्हणाले की, शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला लवकरातलवकर योजनांचा लाभ मिळावा हे प्रमुख उद्दीष्ठ आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 90 हजार जणांपैकी 52 हजार जणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तर 25 मे रोजी तब्बल 25 हजारजणांना लाभ दिला जाणार आहे. यावेळी विविध योजनांमधून तब्बल 41 कोटी रुपयांचे वाटप लाभार्थ्यांना होणार असून 50 कोटींचे उद्दिष्ठ ठेवण्यात आल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 75 दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी बाईक, 45 व्यक्तींना कृषी विभागामार्फत अत्याधुनिक औजारे, 150 कामगारांना किटचे वाटप यावेळी होणार आहे. यासह लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे.
महाराष्ट्रात हा सर्वात मोठा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अधिकार्‍यांनी उत्कृष्ट काम केल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.

जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास केंद्र रत्नागिरीत सुरु झाले असून, याला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. याचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक मेमोरीयल ग्रंथालयाच्या वाढीव कामाचे उद्घाटन होणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.

आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी 704 कोटी रुपये जिल्ह्यासाठी मिळतील, त्यामधून धूपप्रतिबंधक बंधारे, भूमिगत केबल, निवारा शेड आदी उभारले जाणार असल्याची माहिती ना. सामंत यांनी दिली. यानिमित्ताने बुधवारी 24 रोजी आयटीआय येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तर 25 मे रोजी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहितीही ना. सामंत यांनी दिली.