वाढत्या उष्म्यामुळे हापुसमध्ये साका तयार होण्याचा धोका

रत्नागिरी:- वाढत्या तापमानामुळे हापूसमध्ये साका तयार होण्याची समस्या यंदा बागायतदारांना अडचणीची ठरली आहे. त्यावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता. आंबा काढणीपासून ते वाहतूकीपर्यंत होणारी हाताळणी करताना बागायतदारांना कसरत करावी लागली.साका म्हणजे आंब्यामध्ये कापसासारखा पांढरा भाग तयार होणे किंवा तो भाग आंब्याच्या गरपेक्षा रंगाने वेगळा असतो. तो अतिशय आंबट असतो. वाढत्या तापमानामुळे हापुसमध्ये साका मोठ्याप्रमाणात आढळतो.

ज्या आंब्यांचे देठ खोल गेलेले आहेत, ज्यांचे खांदे अति उंचावलेले आहेत आणि आंब्याला बर्‍यापैकी गोलाई आलेली आहे, आंबा गोलाकार फुगल्यासारखा वाटतो त्यात साका होतो. जागतिक तापमानात होणारी वाढ ही साका निर्मितीच्या प्रक्रियेला कारणीभूत ठरत आहे. भविष्यात साक्याची समस्या अधिक जटिल होणार असून त्याला सामोरे जाण्यासाठी आंबा बागायतदारांनी तयारी करायला पाहीजे. फळांची काढणी उन्हातून केल्यामुळे साका आणि फळं काढणीनंतर उन्हात ठेवल्यावर साका होतो. फळे बाजारपेठेत पाठवतानाही कडक उन्हातून फळांची ने-आण केल्यासही ही परिस्थिती ओढवते. झाडामध्ये कॅल्शियमची कमतरता असली तरी आंब्यांमध्ये साका होण्याची शक्यता जास्त असते. हापूस बॉक्समधून लांबच्या बाजारपेठेत पाठवताना उष्णता साठून राहिल्यामुळे, पुरेशी हवा खेळती न राहिल्यामुळे, चुकीच्या वाहतुकीच्या पद्धतीमुळे, सदोष हाताळणीमुळेही साक्याचा धोका असतो. तसेच हापुसची कलमे करण्यासाठी हापुसचा बाटा वापरल्यास साक्याची शक्यता वाढते. यावर उपाययोजना करण्यासाठी फळांची काढणी 14 आणे (85 ) तयार झाली असताना काढावीत, फळांचे देठ खोल जाईपर्यंत व फळाला पूर्ण गोलाई येईपर्यंत वाट पाहु नये, उन्हातून फळं काढणी न करता सकाळी उजडलेले असताना सहा ते सात वाजल्यापासून सकाळी साडे दहा ते अकरा आणि संध्याकाळी चार ते साधारण दिसेपर्यंत म्हणजेच सात वाजेपर्यंत करावी. फळांची काढणी झाल्यानंतर फळे सावलीत ठेवावीत तसेच सावलीच्या ठिकाणी साठवावीत.

संध्याकाळनंतर वाहतूक करा

बाजारपेठेत नेण्यासाठी विशेषता लांबच्या बाजारपेठेत नेताना संध्याकाळी 5 ते सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत पर्यंत फळांची वाहतूक करावी. साका शोधक यंत्राचा वापर करून आंबे मार्केटला पाठवावेत. परंतु सध्यातरी हे यंत्र महाग आहे, सामूहिक पातळीवर या यंत्राचा वापर करता आला तर पहावे. वाहतुकीमध्ये तापमान वाढून होणार्‍या साक्याचा मात्र प्रश्न उद्भवू शकतो.