धनादेश न वटल्याप्रकरणी सहा महिने कैदेची शिक्षा

रत्नागिरी:- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खेड येथील शाखेस कर्जाच्या परताव्यापोटी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी विलास तुकाराम शिगवण (रा. वेरळ, ता. खेड) यांना ६ महिने साध्या कैदेच्या शिक्षेसह दंडाची शिक्षा सुनावली आहे.

जानेवारी २०१६ मध्ये शिगवण यांनी बँकेकडून ५ लाख रूपये कर्ज घेतले होते. या कर्ज वसुलीदरम्यान कर्जाचा परतावा म्हणून त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचा ७९ हजार ५०० रुपयांचा धनादेश बँकेत दिला होता. हा धनादेश न वटल्याने बँकेने खेड येथील फौजदारी न्यायालयात खटला दाखल केला. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना ६ महिने साध्या कैदेची शिक्षा, ८५ हजार रुपये नुकसान भरपाई तसेच प्रकरण दाखल झाल्यापासून ९ टक्के दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बँकेच्या वतीने अॅड. संदेश चिकणे यांनी काम पाहिले.