नासा, इस्त्रोला गेलेल्यांपैकी एकतरी विद्यार्थी अब्दुल कलाम झाला पाहीजे: ना. सामंत

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळेत शिकणारा शेतकरी कुटूंबातील नासा, इस्त्रो भेटीला गेलेल्यांपैकी एकतरी विद्यार्थी अब्दुल कलाम झाला पाहीजे अशी आमची इच्छा आहे. शास्त्रज्ञ बनायचे असेल तर त रत्नागिरीत यावे लागते संपूर्ण देशात असा संदेश गेला पाहीजे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. तसेच यंदा नासाला नऊ विद्यार्थी जाणार आहेत, पुढील वर्षी वीस जातील तर इस्त्रोला 50 विद्यार्थी जातील अशी तरतूद भविष्यासाठी केली जाईल असेही आश्‍वासन त्यांनी दिले.

नासा, इस्त्रोला जाणार्‍या विद्यार्थ्यांसह पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुळकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. मंत्री सामंत यांच्या हस्ते मुलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, जिल्हा परिषद शाळांमधील मुले नासा, इस्त्रोला नेण्यासाठी अधिकारी पाठपुरवा करत होते. पण शेतकर्‍यांची मुले पाठवण्याचा निर्णय कुणाला घेता आला नाही. त्यासाठी दिड कोटी लागणार होते. मुलांच्या भवितव्यासाठी कितीही फंड ओतावा लागला तरी चालेल पण त्यांना पाठवायचे असा मी निर्णय घेतला. मी अमेरिकेला गेलेलो नाही, पण माझ्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मुले तिकडे जात असल्याचा सार्थ अभिमान आहे. या उपक्रमाला दिड कोटीच काय तर दिडशे कोटी खर्च करावे लागले तरीही ते देण्याची आमची तयारी आहे. इंग्रजी शाळेत शिकलो, म्हणजे मंत्री होता येते हा गैरसमज आहे. मीही जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन इथपर्यंत पोचलो आहे, असे सांगत मंत्री सामंत यांनी ग्रामीण भागातील शाळांचे महत्व पटवून दिले. कलाम आणि शिक्षक यांचे जवळचे नाते आहे. माजी राष्ट्रपती कलाम यांची भेट झाली तेव्हा त्यांनी सांगितले. भारत बलशाली करायचे असेल तर पहिली ते चौथीचा पाया भक्कम झाला पाहीजे. त्यासाठी विविध उपक्रम राबवले पाहीजेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सहाही भारतरत्नाची माहिती प्रत्येकाला व्हावी यासाठी जेजे स्कुल ऑफ आर्टस्च्या मदतीने मोठा प्रकल्प रत्नागिरीत बनवण्यात येत आहे.


चौकट

शिक्षणात राजकारण नको ः सामंत

शैक्षणिक उपक्रमात राजकारण करु नये. त्यासाठी अनेक दरवाजे आहेत. पुढील पिढी घडवायची असेल तर सर्वांनी एकत्र आले पाहीजे. जोपर्यंत आधूनिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत मिळत नाही, तोपर्यंत खाजगी शाळेकडील ओघ वाढणार नाही. त्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना समजवावे लागेल. जिल्हा परिषद शाळेतही चांगले शिक्षण मिळते हे सांगण्याची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांची आहे. सध्या राजकारण खालच्या दर्जाला गेेले आहे. काही लोकं सावरकरांवर टिका करत आहेत. ते उद्या लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर टिका करतील. परंतु या महान व्यक्तींनी जो आदर्श दिला आहे, त्याचे वाचन प्रत्येकाने केले पाहीजे. यासाठी जिल्हा परिषदेने राजकीय पुरुषांची चरित्र विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचा उपक्रम राबवला पाहीजे, अशी सुचना मंत्री सामंत यांनी केली.

पुढील वर्षी शिक्षकांमध्ये स्पर्धा झाली पाहीजे. शिक्षकांचे टॅलेंट सर्च करून त्यांची निवड करावी त्यासाठी जिल्हा नियोजनमधून आर्थिक तरतूद केली जाईल. उद्योगमंत्री झाल्यानंतर जिल्हापरिषदेला सीएसआरमधून 5 कोटी जमा करून देणार आहे. त्यातील 1 कोटी पोचले आहेत. त्याचा उपयोग शाळा दुरुस्तीसाठी केला जाणार असल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.मी अनेक राज्यात, परदेशात फिरतो, पण रत्नागिरीतील शिक्षकांसारखे शिक्षक अन्य कुठेही दिसत नाहीत.

पंकज चवंडे, आरती अपेक्षाचा आदर्श घ्या

नासा, इस्त्रोला जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या सत्कारापुर्वी पाच जणांचे सत्कार जाणीव पुर्वक आधी केले. महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेेचे माजी सचिव संदिप तावडे हे मार्गदर्शकाच्या भुमिकेत आहेत. तर प्रत्यक्ष मैदानावर पंकज चवंडे मुलांना घडवतात. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज शिवछत्रपती पुरस्काराच्या यादीत अपेक्षा सुतार, आरती कांबळे या खेळाडू आल्या आहेत. हा खर्‍या अर्थाने भाग्याचा क्षण आहे. त्यांचा आदर्श भविष्यात सर्व खेळाडूंनी घेतला पाहीजे. हा पुरस्कार का मिळतो हे जिल्हा परिषद शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगायची गरज आहे. दोन मुलींबरोबरच प्रशिक्षक पंकज चंवडे यांनाही पुरस्कार मिळाला पाहीजे होता. पण दोन पुरस्कारप्राप्त मुलांना घडवण्यासाठीचा हा सत्कार पुरस्काराप्रमाणेच आहे. पुरस्काराबाबत पंकज चवंडे यांना मी म्हटले की पुढील वर्षी तुम्हाला मिळेल. तेव्हा पंकज म्हणाला माझी अपेक्षा पूर्ण झाली. त्यांचे हेच उत्तर सर्वांसाठी आदर्शवत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी अपेक्षा, आरतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा तर शिक्षकांनी पंकजचा आदर्श घ्यावा. असे आदर्शवत प्रशिक्षक आणि खेळाडू आहेत, त्या जिल्हयाचा पालकमंत्री असल्याचा मला अभिमान आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. याप्रसंगी संदिप तावडे, पंकज चवंडे, यांच्यासह अपेक्षा सुतार, आरती कांबळे आणि ठाण्याची प्रियाकां भोपी यांचा सत्कार करण्यात आला.