पाली येथे देवदर्शन आटपून परतणाऱ्या मंडणगड मधील भाविकांवर काळाचा घाला

कार झाडावर आदळून एक ठार नऊजण जखमी

मंडणगड:- पाली येथे देवदर्शनाकरिता गेलेल्या घोगरेकर, जगताप व पवार कुटुंबियांवर काळाने घाला घातला. रविवारी रात्री 11.30 वाजता परतीच्या प्रवासात त्यांची झायलो गाडी महाड तालुक्यातील कोंडमालुसरे याठिकाणी झाडावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात एक वयोवृद्ध महिला जागा ठार झाली, तर 9 जण जखमी झाले. यापैकी 6 जण गंभीर आहेत. यामुळे घोगरेकर, जगताप व पवार कुटुंबियांवर शोककळा पसरली.

या अपघातात लक्ष्मी धाकट्या घोगरेकर (75, लाटवण आदिवासीवाडी) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गाडीतील अनिता संतोष घोगरेकर (40), अर्चना गोपाल जगताप (26), सुमीत संतोष घोगरेकर (14), पूर्वा संतोष घोगरेकर (12), सुमेध संदीप घोगरेकर (दीड वर्ष), संतोष धाकट्या घोगरेकर (40) हे गंभीर जखमी, तर वनिता संतोष घोगरेकर (40), सूरज गणेश पवार (25), आर्यन संदीप घोगरेकर (15, सर्व राहणार लाटवण- आदिवासीवाडी) यांना किरकोळ दुःखापत झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने घोगरेकर, जगताप व पवार कुटुंब एर्टिगा व झायलो या दोन गाड्यांमधून देवदर्शनाकरिता रायगड जिल्ह्यातील पाली येथे गेले होते. देवदर्शनाचा कार्यक्रम आटोपून सर्वजण रात्री घराकडे परतत असताना घरापासून काही मीटर अंतरावर आलेले असताना झायलो गाडीच्या चालकाचा गाडीवरुन ताबा सुटून गाडी रस्त्याशेजारी असलेल्या झाडावर आदळून हा अपघात घडला.

या अपघातातील जखमींवर मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन त्यांना पुढील उपचाराकरिता डेरवण येथे पाठविण्यात आले व डेरवण येथून पुढील उपचाराकरिता मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मंडणगड पोलीस स्थानकात या घटनेसंदर्भात जवाब घेण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.