जातीवाचक शिवीगाळीची तक्रार घेण्यास टाळाटाळ

तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा संजय निवळकर यांचा आरोप

रत्नागिरी:- निवळी सरपंचांनी केलेल्या जातीवाचक शिवीगाळीची तक्रार देऊनही ग्रामीण पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत. दि.11 मे रोजी तक्रार दिल्यानंतरही अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नसून पोलीस निरीक्षक मारूती जगताप तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस पाटलांच्या माध्यमातून दबाव टाकत असल्याचा आरोप भारतीय चर्मकार समाज मुंबईचे जिल्हाध्यक्ष व निवळीचे उपसरपंच संजय निवळकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तर पोलीस निरीक्षक मारूती जगताप, पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी जाणीवपूर्वक मला पोलीस स्थानकात हीन दर्जाची वागणूक दिल्याचा आक्षेप श्री.निवळकर यांनी केला असून याबाबतची तक्रार पोलीस अधिक्षक श्री.धनंजय कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली आहे.

श्री.संजय निवळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार निवळी गावात दोन प्रभागात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दोन जागेवर ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता त्या अर्जाविरोधात आपण आक्षेप घेतला. जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याने एक अर्ज बाद झाला. याचा जाब विचारण्यासाठी गावाने मला बैठकीत निमंत्रित केले होते. यावेळी मी माझी बाजू मांडली. बैठक संपल्यानंतर निवळीच्या सरपंच तन्वी प्रशांत कोकजे या बैठकीला नसतानाही तेथे आल्या. त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना दि.11 मे रोजी घडली. त्यानंतर सायंकाळी 7.30 मी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी गेलो होतो. पहाटे 4 वाजेपर्यंत मला जबाब घेऊन बसवून ठेवले. त्यानंतर घरी जाण्यास सांगितले.

मी दिलेल्या जबाबातील माहिती दाखल करण्यात येणाऱ्या गुन्ह्यात घेण्यात आली नसल्याने मी त्यावर अद्यापही सही केलेली नाही तर एफआयआर न वाचता त्यावर सही करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राठोड दबाव टाकत होत्या असा आक्षेप श्री.निवळकर यांनी घेतला आहे.

जातीवाचक शिवीगाळ झाल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु ग्रामीण पोलीस जाणीवपूर्वक गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत. याबाबतची लेखी तक्रार पोलीस अधिक्षक श्री.धनंजय कुलकर्णी यांच्याकडे केली असून टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आपण केल्याचे श्री.निवळकर यांनी सांगितले.