बारसूतील पोलीस बंदोबस्त मागे, परीक्षेत प्रशासन पास: जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- बारसूमध्ये तेव्हा आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. याबाबत अनेक अफवा पसरविण्यात आल्या. आम्ही कुठेही लाठीमार केलेला नाही. बारसूसह ६ गावांच्या परिसरामध्ये माती परीक्षणासाठी ६७ बोअरवेल मारण्याचे काम पूर्ण झाले. माती नमुने परीक्षणासाठी पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर पुढचा निर्णय शासनस्तरावर होईल. या दरम्यान ३२६ जणांवर कारवाई करण्यात आली. आज पूर्ण पोलिस बंदोबस्त मागे घेतला. शासनाने टाकलेल्या मोठ्या जबाबदारीत आम्ही पास झालो. स्थानिकांनी प्रकल्पाबाबत नकारात्मक बाजू बघण्यापेक्षा सकारात्मक बाजू बघाव्या, असे आवाहन जिल्हाधिकारी देवेंदर सिंह आणि पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, बारसू येथे प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरीवरून गेली १७ दिवस वातावरण तापलेले होते. स्थानिकांचा या प्रकल्पाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या माती परीक्षणाला विरोध केला. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होती. त्याअनुषंगाने पोलिस आणि जिल्हा प्रशासन म्हणून कायदा व सुव्यस्था राखण्याची जबाबदारी होती. बारसू, धोपेश्वर, पन्हाळे, राजापूर-पन्हाळे, गोवळ खालचीवाडी, गोवळ वरचीवाडी, अशा ६ गावांच्या परिसरामध्ये माती परीक्षणासाठी ड्रिलिंग करण्याचे काम सुरू होते. गुरुवारी (ता. ११) ६७ ठिकाणी बोअरिंग मारण्याचा काम पूर्ण झाले. प्रत्येक गावात ८ ते ११ दरम्यान बोअरिंग आहेत. त्याचे नमुने आता तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर रिफायनरीचा दुसरा टप्पा सुरू होईल. ही सर्व प्रक्रिया एमआयडीसी आणि अरामको कंपनीकडून झाली. या भागात पूर्ण कातळ असून १० टक्के पेक्षा कमी भागात कलमांची लागवड आहे. नागरिकांना आम्ही समजावून सांगण्यासाठी दररोज गावागावात जात होतो. मासे, प्रदूषण, आंब्यावर होणारा परिणाम याबाबत नागरिकांच्या शंका दूर व्हाव्यात म्हणून दिल्ली आणि मुंबईतून तज्ज्ञ व्यक्ती बोलावल्या. त्यांनी तांत्रिकदृष्ट्या त्यांना समजावून सांगितले. परंतु एवढे करूनही नागरिकांनी ठरविल्याप्रमाणे आमचा विरोधच आहे, असे सांगितले.

सुरुवातीला ४०० च्या वर लोकांचा विरोध होता. तो हळुहळू कमी होत होता. अखेरच्या टप्प्यात १०० नव्हे तर ५० लोकपण उपस्थित नव्हते. पोलिसांच्या एका दिवसाचा जेवण-खाण्याच्या खर्चाबाबत प्रशासनाने हात वर केले. एमआयडीसीकडून त्याचा पुरवठा होत होता. याबाबत माहिती घ्यावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

३२६ जणांवर कारवाई

गेल्या सतरा दिवसांमध्ये पोलिसांनी सुरवातीला चौघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यानंतर कलम १४४-२ नुसार वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करून ३२६ लोकांवर कारवाई करण्यात आली. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी ७ जणांवर ३५३ चा गुन्हा दाखल केला होता. तो मागे घेण्यात आला. गुन्हा दाखल करताना गयावाया करणारे आणि शेतीच्या कामांची कारणे देणारे दुसऱ्या दिवशी आंदोलनात दिसायचे, अशी प्रवृत्ती दिसून आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.