लग्नाला निघालेली रिक्षा नातुवाडी कॅनलमध्ये कोसळली; एक ठार तर सहाजण गंभीर

खेड:- खेड शिवतर मार्गावर मुरडे शिंदेवाडी या ठिकाणी नातेवाईकांच्या लग्नाला जात असताना रिक्षा नातूवाडी धरणाच्या कॅनलमध्ये कोसळून अपघात झाला. मंगळवारी 9 मे रोजी दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

खेडमधील एकाच कुटुंबातील सातजण ऑटो रिक्षा मधून मुरडे शिंदेवाडी या ठिकाणी आपल्या नातेवाईकांच्या लग्नाला जात होते. नातूवाडी धरणाच्या कॅनॉलच्या ठिकाणी रिक्षा चढली नाही व यावेळी रिक्षा चालकाचा ताबा सुटून रिक्षा थेट आठ ते दहा फूट खोल असणाऱ्या कॅनॉलमध्ये पडली.

या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच गावकऱ्यांनी जखमींना तात्काळ खेडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.