मिनी मंत्रालयात बदल्यांची लगबग; ११, १२ रोजी समुपदेशन प्रक्रिया

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेत वर्ग 3 व वर्ग 4 मधील कर्मचार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्यांची लगबग सुरू आहे. 11 ते 12 मे या कालावधीत रिक्त जागांवर या बदल्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी समुपदेशन होणार आहे. काही वर्षांपासून एकाच टेबलावर असलेल्या संबंधित कर्मचार्‍यांना आता ती खुर्ची सोडून दुसरीकडे जावे लागणार असल्याने अनेक कर्मचार्‍यांची चिंता वाढली आहे.

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही वेळीच होण्याच्यादृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी प्रत्येक संवर्गासाठी वास्तव सेवा ज्येष्ठता सुची तयार करण्याच्या सूचना सामान्य प्रशासनाला दिल्या होत्या. त्यावर हरकती पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात बदली प्रक्रिया राबवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून तयारी पूर्ण केली आहे. दोन दिवसांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
वेळापत्रकानुसार 11 ते 12 मे या दरम्यान हे समुपदेशन शामराव पेजे सभागृहात होणार आहे. 11 मे रोजी सामान्य प्रशासन विभागातील सकाळी 9.30 ते 2 या वेळेत सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक तर आरोग्य विभागातील दुपारी 2 नंतर संपेपर्यंत आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, स्त्री परिचर, सफाई कामगार तसेच शुक्रवारी 12 मे रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2 या वेळेत वित्त विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, महिला बालकल्याण विभाग, शैक्षणिक विभाग, बांधकाम विभाग यामधील सहाय्यक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी शिक्षण, केंद्रप्रमुख, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, चौकीदार, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तर दुपारी 2 नंतर संपेपर्यंत ग्रामपंचायत विभागातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांचे समुपदेशन होणार आहे.