एमआयडीसीच्या धरणातील गाळ उपसण्याचा प्रस्ताव पाच वर्षांपासून अडकला लाल फितीत

रत्नागिरी:- एमआयडीसीच्या हरचेरी, असोडे, बावनदी धरणातील गाळ उपसण्यासाठी सन २०१९ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात परवानगीचा प्रस्ताव दिला आहे. पाच वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयाने अद्यापर्यंत एमआयडीसीला गाळ काढण्याची परवानगी दिलेली नाही. पाऊस काही दिवसात सुरू होण्याची शक्यता असल्याने यावर्षीही धरणातील गाळ जैसे थे राहणार आहे.

एमआयडीसीने सन १९७० मध्ये हरचेरी येथे धरण बांधले. सुमारे २.९७ दलघमी पाणी साठवण क्षमता या धरणाची आहे. परंतु गेल्या ५५ वर्षात एकदाही धरणातील गाळ काढण्यात आलेला नाही. गाळामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होत आहे. त्यामुळे गाळ उपसणे गरजेचे आहे. यासाठीच सन २०१९ मध्ये एमआयडीसीने हरचेरीसह असोडे (लांजा), बावनदी धराणातील गाळ उपसण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परवानगी मागितली होती. परंतु एमआयसीची फाईल जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल पाच वर्ष धूळ खात पडून आहे.
हरचेरी धरणावरून मिरजोळे उद्यामनगर एमआयडीसीसह रत्नागिरी शहराचा वरचा भाग तसेच नऊ गÏामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो. तर बावनदी धरणातून जिंदालसह जयगड पंचक्रोशीतील गावांना पाणी पुरवठा केला जातो.

सध्या हरचेरी धरणात ६ जूनपर्यंत पूरले एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र जून महिन्यात पाऊस लांबणीवर पडल्यानंतर एमआयडीसीला पाणीटंचाईची झळ बसते. यावर्षी एक दिवसाआड पाणी देण्याची वेळ एमआयडीसीवर येते. सद्यस्थितीत गाळ काढण्याचे काम होऊ शकते. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी न दिल्याने गाळ काढण्याचे काम सुरू करणे शक्य नाही. गाळामुळे पाण्याची क्षमता कमी झाली आहे. गतवर्षी गाळ काढण्यात आला असता, तर यावर्षी पंधरा ते वीस जूनपर्यंत पर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करणे एमआयडीसीला शक्य होते. एमआयडीसीच्या हरचेरी धरणात काही लाख हजार क्युबिक मीटर गाळ आहे. तर बावनदी, असोडे धरणाचीही हिच स्थिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी दिल्यानंतरच गाळ काढण्याचा मुहूर्त मिळणार आहे.

धरणातील गाळकडे पालकमंत्री लक्ष देणार का?
रत्नागिरी एमआयडीसीच्या धरणातील गाळचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाच वर्ष गाळ उपश्याची फाईल जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहे. धरणातील गाळ काढण्याऐवजी आता फाईलवरील धूळ साफ करेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाच्या गतीमान कारभाराकडे पालकमंत्री ना.उदय सामंत लक्ष देणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.