शुन्य सावलीचा अविष्कार रत्नागिरीकरांनी अनुभवला

वर्षातून दोनवेळा स्थिती; विषुवृत्तापासून 23.5 अंशावर सुर्य

रत्नागिरी:- विषुवृत्तापासून 23.5 अंश दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे अशा विशिष्ठी ठिकाणी सुर्य आला कि सावली गायब होते म्हणजेच ती शुन्य होते. हा वैज्ञानिक अविष्कार रत्नागिरी जिल्ह्यात वर्षातून दोन वेळा अनुभवयास मिळतो. याचा प्रत्यय अनेक रत्नागिरीकरांनी रविवारी (ता. 7) घेतला. गोगटे जवळकर महाविद्यालयाच्या खगोल अभ्यास केंद्राने केलेल्या आवाहनाला रत्नागिरीतील मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी रिंगण करून पायामध्ये सावली कशी येते हे पाहिले, त्याचे फोटो काढून खगोल अभ्यासकांनाही टाकले.

सुर्य विशिष्ठ स्थिती डोक्यावर आल्यानंतर सावली पायाच्या मधोमध येते. ही स्थिती सुर्य विषुवृत्ताच्या विशिष्ठ अंक्षांशावर आल्यानंतर निर्माण होते. रत्नागिरी जिल्हा 17 अंश अक्षांशावर असल्यामुळे 7 मे रोजी दुपारी 12.33 वाजता शुन्य सावलीची स्थिती होती. याबाबत खगोल केंद्रामार्फत मुलांसह अभ्यासकांना याचा अनुभव घेण्यासाठी आवाहन केले होते. त्यानुसार आज दुपारी तारांगण येथील कर्मचारी, उद्यमनगर येथील मुले यासह रत्नागिरीतील शंभरहून अधिक नागरिकांनी ही परिस्थिती कशी असते त्याचा अनुभव घेतला. हा वैज्ञानिक अविष्कार आहे. सुर्याची स्थिती आल्यानंतर कोणत्याही वस्तूची सावली शुन्य होते. रत्नागिरीत 5 ऑगस्टला पुन्हा ही स्थिती निर्माण होणार असल्याचे खगोल अभ्यासकांनी सांगितले. उद्यमनगर येथील मुलांनी रिंगण करुन मध्ये बाटली ठेवली आणि शुन्य सावलीचा फोटोही काढला. रत्नागिरीतील काहींनी दीड ते दोन फूट उंचीची काठी बरोबर काटकोनात जमिनीवर रोवून त्याची सावली कशी पडते हे पाहीले. कठीण पण एखादी उभी वस्तू उदाहरणार्थ बाटली, थर्मास, खडू दुपारच्या सुमारास उन्हात सपाट ठिकाणी ठेवूनही त्या वस्तूंच्या सावलीचे निरीक्षण केले.

मुलांना खगोलाची आवड

शुन्य सावलीबाबत प्रा. बाबासाहेब सुतार म्हणाले, मुलांना खगोलाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील निरीक्षण शक्ती जागृत करण्यासाठी खगोल केंद्र प्रयत्नशील असते. त्यानुसार आज शुन्य सावलीचा अनुभव घेण्यासाठी आवाहन केले होते. हा वैज्ञानिक अविष्कार रत्नागिरीतील अनेकांनी अनुभवला. यामध्ये विद्यार्थ्यांचा समावेश अधिक होता.