रत्नागिरीतील गाजलेल्या सेंट्रल बँक दरोड्याच्या निकालाकडे नजरा

रत्नागिरी:- जिल्हाभर गाजलेल्या जाकादेवी सेंटल बँक दरोडा खटल्याचा निकाल २४ मे २०२३ रोजी ठेवण्यात आला आहे. दरोड्यात एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला होता. तसेच बँकेतील ६ लाख रूपयांची रोकड लुटून नेल्याचा आरोप ६ संशयितांविरूद्ध ठेवण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१३ साली घडलेल्या या दरोड्याचा खटला सत्र न्यायालयात सुमारे ९ वर्षांपासून प्रलंबित आहे. आता २४ मे रोजी होणाऱ्या निकालावर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

रत्नागिरी सत्र न्यायाधीश विनायक राजाराम जोशी यांच्या न्यायालयापुढे हा खटला चालवण्यात येत आहे. सरकार पक्षाकडून ॲड. पुष्पराज शेट्ये तर आरोपींच्यावतीने ॲड.प्रदीप नेने व ॲड. संकेत घाग यांनी युक्तिवाद केला. एकूण ३५ साक्षीदार खटल्यादरम्यान तपासण्यात आलेत. खुनासह दरोडा अशी ही जिल्ह्यातील पहिलीच घटना ठरली होती. एकूण ६ संशयितांविरूद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून दोषारोपपत्र ठेवण्यात आले आहे.

खटल्यातील माहितीनुसार, जाकादेवी सेंट्रल बँक येथे २८ नोव्हेंबर २०१३ रोजी दरोडा टाकण्यात आला होता. यावेळी संशयित आरोपींनी बँकेतील कर्मचारी संतोष चव्हाण (रा. धामणसे) याला गोळी घालून ठार केले होते. तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला होता. तसेच संशयित आरोपी हे बँकेच्या तिजोरीतील सुमारे ६ लाख ८८ हजार रुपयांची रक्कम घेऊन आरोपी खासगी वाहनाने फरारी झाले, असा आरोप संशयित ६ जणांवर ठेवण्यात आला होता. या आरोपींमध्ये राजेंद्र राजावत (२५, रा. कल्याण), हरिष गोस्वामी (२५, रा. कल्याण), प्रथमेश सावंत (१८, रा. जाकादेवी), शिवाजी भिसे (२५, रा. कल्याण), निखिल सावंत (२४, रा. डोंबिवली) आणि प्रशांत शेलार (२८, रा. मुंबई) यांचा समावेश आहे.

या खटल्यात एकूण ३५ साक्षीदारांनी आपला जबाब न्यायालयापुढे नोंदवला आहे. यातील २ साक्षीदार हे सरकारी पक्षाला फितूर (फुटले) झाले आहेत. बँक दरोडा घटनेला आता ९ वर्ष उलटून गेली असली तरी हा खटला सत्र न्यायालयात अद्याप प्रलंबित राहिला. विविध कारणांनी यापूर्वी या खटल्याच्या कामकाजात अडथळे निर्माण झाले होते. मात्र आता सरकारी वकील व आरोपींचे वकील यांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून निकालाची सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे.

यापूर्वी झालेल्या युक्तिवादावेळी ॲड.. शेट्ये यांनी न्यायालयापुढे सांगितले की, जाकादेवी बँक दरोडा प्रकरणात मृत संतोष चव्हाण याचे कपडे जप्त करण्यात आले होते. त्याच्या शर्ट व बनियनवर होल असल्याचे स्पष्टपणे. दिसत आहे. मृत संतोष चव्हाण यांच्या शरीरावरील बंदुकीच्या गोळीची जखम आहे. तसेच त्याच्या शर्ट, बनियनलाही होल पडला आहे. त्यामुळे बंदुकीची गोळी त्याच्या शर्ट व बनियनमधून शरीरात गेल्याचे स्पष्ट होत आहे. खटल्यातील कपडे जप्तीचा पंचनामा अत्यंत महत्वाचा पुरावा ठरत आहे.

दरोड्याच्या घटनेत गोळी लागून गंभीर जखमी गुरव याच्यावर कोल्हापूर न येथील रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या शरीरात घुसलेली गोळी डॉक्टरांनी बाहेर काढली. ही गोळी बाहेर काढल्यानंतर पंचनामा करण्यात आला. शरीरातून बाहेर काढण्यात आलेल्या गोळीमुळे गुरव याला झालेली जखम ही गोळी मारल्याने झाली होती, हे सिद्ध होते. त्या संबंधीचे ऑपरेशन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षीचा उल्लेख ॲड. पुष्पराज शेट्ये यांनी न्यायालयापुढे केला.

खटल्यातील मुख्य आरोपी राजेंद्र राजावत, शिवाजी भिसे व प्रशात शेलार यांनी पोलिसांना निवेदन दिले होते. त्यांच्या निवेदनानुसार, दरोड्यातील पैसे, बंदूक व इतर मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला होता. तसेच आरोपी प्रशांत याने पळून जाण्यासाठी वापरलेल्या गाडीची बनावट नंबरप्लेट फुणगूस येथे फेकून दिली होती. ही नंबरप्लेट त्याने दिलेल्या निवेदनानुसार, पोलिसांकडून जप्त करण्यात आली. यामुळे आरोपींनी दिलेल्या या निवेदनामुळे सरकारी पक्षाची बाजू बळकट होत असल्याचे ॲड. शेट्ये यांनी सांगितले.