संगमेश्वरातील चिखली मोहल्ल्यात आढळला बिबट्याचा बछडा

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील चिखली मोहल्ला येथे समीर हुसेन हुजूरे यांच्या घराच्या मागील बाजूस लाकडाच्या खोपीखाली एक बिबट्याचा बछडा दिसून आला. याबाबतची माहिती वन विभागाला मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या बछड्यास ताब्यात घेतले. या बछड्यास उपचाराकरिता पुणे येथील केंद्रात पाठवण्यात आले आहे.

तालुक्यातील समीर हुसैन हुजुरे (चिखली मोहल्ला) यांचे राहते घरामागील बाजूस लाकडाच्या खोपीखाली बिबट्याचे पिल्लू बसले असल्याची माहिती पोलिस पाटील रुपेश विठ्ठल कदम यांनी वनविभागास दिली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बिबट्याचा बछडा मोठ्या डालग्याखाली झाकून ठेवल्याचे दिसून आले. घाबरल्याने हा बछडा पळण्याचा प्रयत्न करत होता.

ते विहिरीमध्ये पडेल म्हणून त्याला झाकून ठेवल्याचे पोलिस पाटील कदम यांनी सांगितले. त्यानंतर वनविभागाने पाहणी केली. यात बछड्यास कोणतीही जखम नसल्याची माहिती वनविभागाने दिली. बछडा मादी जातीचे असून त्याचे वय अंदाजे २ ते ३ महिने आहे.

पशुधन विकास अधिकारी देवरूख यांचे मार्फत बछड्याची तपासणी केली असता ते अशक्त असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे त्यास उपचारासाठी वन्यप्राणी प्राथमिक उपचार केंद्र पुणे येथे तत्काळ पाठवणेत आले. सदरची कार्यवाही विभागीय वनअधिकारी रत्नागिरी चिपळूण दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार, परिमंडळ वनअधिकारी देवरूख तौफिक मुल्ला करीत आहेत.