नदीत शिंपले काढण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

मंडणगड:- वडवली येथील भारजा नदीच्या पात्रात शिंपले काढण्यासाठी गेलेल्या 8 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना 30 एप्रिल 2023 रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली. सोहम सुरज गावणूक (8, वडवली, मंडणगड) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहम हा आपल्या 2 मित्रांसह शिंपले पकडण्यासाठी भारजा नदीत गेला होता. शिंपले काढताना सोहम हा पाण्यात बुडाला. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न मित्रांनी केला मात्र तो कुठेच आढळून आला नाही. या घटनेची माहिती गावातील लोकांना दिल्यानंतर ग्रामस्थ व नातेवाईकांनी नदीच्या पात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा मृतदेह उघडया स्थितीत पाण्यावर दिसून आला. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे