स्वप्राली सावंत खूनप्रकरणी संशयिताचा जामीन अर्ज फेटाळला

रत्नागिरी:- रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयिताचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला.

छोटा भाई उर्फ रूपेश कमलाकर सावंत (वय ४३, रा. सडामिर्या रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ३१ ऑगस्ट २०२२ रोजी हा प्रकार घडला होता. स्वप्नाली सावंत या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार भाई सावंत यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांच्या तपासात १ सप्टेंबरला स्वप्नाली सावंत यांचा पती सुकांत उर्फ भाई सावंत व अन्य दोघांनी मिऱ्या येथील घरामध्ये स्वप्नाली सावंत यांचा गळा आवळून खून केला तसेच त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला तसेच त्याची राख व हाडे समुद्रात फेकून दिल्याचे पुढे आले होते. या प्रकरणी सुकांत उर्फ भाई गजानन सावंत (वय ४७), रूपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत (वय ४३) व प्रमोद उर्फ पम्या बाळू रावणंग (सर्व रा. सडामिया- रत्नागिरी) या संशयिताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणी छोटा भाई उर्फ रूपेश सावंत यांनी न्यायालयात जामीन मिळावा, अशी मागणी अर्ज केला होता. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी जामीन अर्जावर निकाल दिला. सरकार पक्षाकडून ॲड. अनिरूद्ध फणसेकर यांनी न्यायालयापुढे युक्तीवाद केला.