जिल्हा परिषद महिला परिचर महासंघातर्फे 1 मे रोजी बेमुदत साखळी धरणे आंदोलन

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघातर्फे विविध मागण्यांसाठी 1 मे रोजी आझाद मैदान येथे बेमुदत साखळी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या बाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला जिल्हा शाखेतर्फे देण्यात आले.
गेली अनेक वर्षे या महिला परिचर विविध मागण्यांसाठी शासनाकडे संघर्ष करीत आहेत. 1 मे पासून मुंबई येथे आझाद मैदानावर बेमुदत साखळी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या मागण्यांचे निवेदन मंगळवारी जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेच्या आकांक्षा कांबळे, सुप्रिया पवार, जया तोडणकर, प्रिया खैर, संचिता गवळी, कल्पना नार्वेकर, सुरेखा शिंदे, शितल महाडिक आदी उपस्थित होत्या. मानधन वाढ मिळावी, नियमित सेवेत कायम करावे, अंशकालीन नावात बदल करावेत, रिक्त पदांवर वारसदारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, दरवर्षी गणवेश व भाऊबिज यासाठी 2 हजार रूपये देण्यात यावेत, दर महिन्याच्या 5 तारखेच्या आत मानधन अदा करावे या प्रमुख मागण्या आहेत.