दापोली आंजर्ले खाडीत बोट बुडाली

दापोली:- तालुक्यातील आंजर्ले खाडीत सिद्धेश साई नावाची मासेमारी बोट गाळात अडकून बुडाली. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून, या भागातील गाळाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आंजर्ले खाडीत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने बोटी रुतण्याचे प्रकार वाढले आहेत. ‘ सिद्धेश साई ‘ नावाची बोट (आयएनडी / एमएच ४ / एमएम ४१७०) खाडीत येत असताना गाळात रुतली. त्यामुळे बोटीच्या खाली बॅलन्स येण्याकरिता लावलेल्या दोन कचोऱ्यांपैकी एक कचोरा तुटला. त्यामुळे बोट कलंडून गाळात रुतली. यामुळे बोट बुडाली असून, बोटीचे नुकसान झाले आहे. खाडीतील नुकसानग्रस्त बोट वत्सला पांडुरंग पावशे यांच्या मालकीची आहे .