मे महिन्यापर्यंत सर्व खतांचा पुरवठा करा

जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी यांच्या सूचना

रत्नागिरी:- में महिन्याअखेरपर्यंत सर्व खताचा पुरवठा करा, अशा सूचना खत वितरक कंपनीना जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी दिले आहेत. त्यामुळे गेली दोन वर्षे वाहतुकीमधील अडथळ्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध झालेले नव्हते. ती परिस्थिती यंदा उद्भवणार नाही, अशी तजवीज बैठकित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील बियाणे, खते व कीटकनाशके विक्रेते तसेच उत्पादक कंपनी यांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी सुनंदा कुर्‍हाडे यांच्या अध्यक्षतेखाली पुर्वनियोजन बैठक घेण्यात आली. या सभेमध्ये खरीप हंगामासाठी लागणारे भात व नाचणी बियाणे पुरवठाबाबत चर्चा झाली. तसेच भात पिकासाठी लागणार्‍या खतांमध्ये महत्त्वाचे असणारे युरिया खताच्या पुरवठ्याबाबत आरसीएफ कंपनीच्या प्रतिनिधी समवेत नियोजन करण्यात आहे. में महिन्याअखेर सर्व खताचा पुरवठा करण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी खते व बियाणे यांची विनापरवाना विक्री केली जाते, अशा ठिकाणी तात्काळ संबंधित तालुक्याच्या तक्रार निवारण समिती किंवा भरारी पथकाला माहिती देण्याबाबत आवाहन केले आहे. शेतकर्‍यांना पुरवठा करण्यात येणार्‍या निविष्ठांचा दर्जा उत्तम राखण्यासाठी जिल्ह्यातील निरीक्षकांना सर्व कृषी सेवा केंद्रांची तपासणी करणे तसेच आलेल्या निविष्ठांचे नमुने घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. सर्व परवानाधारकांनी निविष्ठा विक्री संदर्भात कायद्यातील नियमांचे पालन करण्याबाबत आणि शेतकर्‍यांना उत्तम दर्जाच्या निविष्ठा वेळेत पुरवण्याबाबत सूचना सभेमध्ये देण्यात आल्या.

या सभेसाठी कृषी विकास अधिकारी अजय शेंडे, भात संशोधन केंद्र प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी, कृषी अधिकारी श्री पोकळे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सागर साळुंखे, जिल्हा अध्यक्ष माफदा बाबा दळी, तालुका खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक, खत उत्पादक कंपनी आरसीएफ, इफको व एमएआयडीसी यांचे प्रतिनिधी व मोठ्या संख्येने जिल्ह्यातील सर्व खते, बियाणे विक्रेते उपस्थित होते.

पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

कृषी सेवा केंद्रांनी कायद्यातील नियमांचे उल्लंघन करणार्‍या पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. बियाणे, खते व कीटकनाशके यांचे जिल्ह्यातून विविध विक्री केंद्रामधून घेतलेल्या नमुन्यांपैकी अप्रमाणित नमुने असलेल्या विक्री व उत्पादन करणार्‍या कंपन्याविरुद्ध तीन कोर्ट केसेसही दाखल आहेत, अशी माहिती श्रीमती कुर्‍हाडे यांनी दिली.