चर्चेने प्रश्न सोडवण्याची आमची तयारी मात्र अशांतता माजवण्याचा प्रयत्न झाल्यास कारवाई होणारच: पोलीस अधीक्षक

रत्नागिरी:- रिफायनरी विरोधकांना स्वतः जिल्हाधिकारी यांनी समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र चर्चा न करताच केवळ विरोध करण्याची काही जणांची भूमिका दिसून येत आहे. आम्ही चर्चेने प्रश्न सोडवण्यासाठी तयार आहोत मात्र, केवळ अशांतता माजवण्याचा प्रयत्न होणार असेल तर त्या ठिकाणी कारवाई होणारच असा थेट इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिला.

जिल्हा पोलिस अधीक्षक येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रिफायनरी करीता मातीच सर्वेक्षण हाती घेण्यात येणार आहे. यासाठी सर्वेक्षण होणाऱ्या भागात केवळ प्रशासनाने परवानगी असलेल्यांना प्रवेश दिला जाईल. या पार्श्वभूमीवर ४५ जणांना जिल्हा तसेच गावबंदी करण्यात आली आहे. दोन जणांना अटक करण्यात आली असून आणखी दोन जणांवर कारवाईची शक्यता असल्याचे ते म्हणाले. सकाळ पासून एक चिट्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असून याची सत्यता आम्ही तपासात असल्याचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले.