प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला २५ लाखांचा निधी

रत्नागिरी:- जिल्ह्यात तयार होणारा प्लास्टीक कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वच्छता अभियानातून प्रत्येक तालुक्याला 25 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. नऊ पैकी सात तालुक्यामधील कामांना वर्कऑर्डर मिळाली असून मे अखेरपर्यंत प्रकल्प कार्यान्वित केले जाणार आहे.

प्लास्टीक बाटल्यांसह पिशव्या जागोजागी टाकल्यामुळे त्याचे दुष्परिणाम होतात. त्यावर उपाययोजना म्हणून जिल्हा परिषद स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाकडून जिल्ह्यात प्लास्टीक प्रक्रिया प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात मध्यवर्ती ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी जागा निश्‍चित झाल्या असून कचरा संकलीत करुन तेथे आणला जाणार आहे. हा प्रकल्प सुरु ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे सोपवली आहे. यामधून ग्रामपंचायतीलाही उत्पन्न मिळणार आहे. प्रत्येक तालुक्याला 25 लाख रुपयांची तरतूद केली आहे. या कामांना जिल्हा प्रशासनाकडून वर्कऑर्डर मिळाल्याने प्रकल्पाचे काम येत्या काही दिवसात सुरु होईल. प्रक्रिया प्रकल्प मे अखेरपर्यंत सुुर करण्याचे लक्ष्य निश्‍चित केले आहे. एका प्रकल्पात 3 मशिन, 2 शेड आणि 1 प्लास्टीक वर्गीकरणासाठी 1 वेगळी शेड उभारली जाणार आहे. कचरा स्वच्छ करणे, प्लास्टीक बारीक करणे, बारीक कचरा एकत्रीत करणे यासाठीची तिन मशिने असतील. यामध्ये दररोज एक टनापर्यंतचा कचरा प्रक्रिया करण्यात येणार आहे.