जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांची प्रक्रिया जैसे थे

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसंदर्भात शिक्षण विभागाने मार्गदर्शन मागविल्यामुळे ही प्रक्रिया जैसे थे आहे. त्यामुळे भविष्यात निर्माण होणार्‍या शिक्षकांच्या रिक्त पदांच्या प्रश्‍नाला सामोरे जाण्याच्या चिंतेतून प्रशासनाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. तर परजिल्ह्यात जाणार्‍या सातशेहून अधिक शिक्षकांना भरतीची प्रतिक्षा करावी लागणार आहे

जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या अडीच हजार शाळांमध्ये 1100 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यंदाचे शैक्षणिक वर्ष शेवटच्या टप्प्यात आहे. 2 मे पासून उन्हाळी सुट्ट्या लागतील. त्यानंतर जुन महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. शासनाने 30 एप्रिलपर्यंत आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांना तात्काळ सोडण्यात यावे अशा सुचना महिन्याभरापुर्वी दिल्या होत्या. त्यामध्ये शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करुन कार्यवाही करा असेही नमुद केले होते. त्याचा फायदा घेत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने उचलला. आधीच 16 टक्केहून अधिक पदे रिक्त असतानाच 717 शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने सोडले तर हा टक्का 22 पर्यंत जाणार आहे. तसेच तिनशेहून अधिक शिक्षक पुढील वर्षभरात सेवा निवृत्त होणार आहेत. त्यामुळे रिक्त पदांची संख्या दोन हजाराहून अधिक होईल. पदे रिक्त राहीली तर अनेक शाळांमध्ये शिक्षकच राहणार नाही. ग्रामीण भागातून गोंधळ निर्माण होईल. विद्यार्थ्यांची गुणवत्ताही ढासळू शकते. ही परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी काही दिवसांपुर्वी जिल्हापरिषदेने शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते. त्याला अजुनही प्रतिसाद मिळालेला नाही. रिक्त पदांचा टक्का पाहता शासन बदल्यांना परवानगी देणार नाही अशीच चर्चा सुरु आहे.
मार्गदर्शनाला उत्तर आलेले नसल्याने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया जैसे थेच आहे.