दोन मुलांसह महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा

रत्नागिरी:- मुंबई- गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील माणगाव- कशेणेनजीक मारुती इस्टिलो कार व आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातास कारचालक कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. कारचालक दर्शन विजय तावडे यांनी बेजबाबदारपणे गाडी चालवल्यने दोन लेकरांसह आईच्या जीवावर बेतला. या प्रकरणी कारचालकावर माणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

कारचालक दर्शन तावडे आपल्या मारुती इस्टिलो कारमधून कुटुंबियांसमवेत बोरिवली – मुंबई येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड या आपल्या मूळ गावी येत होते. शुक्रवारी सकाळच्या सुमारास समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांच्या ताब्यातील कार आयशर टेम्पोवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, रिव्या दर्शन तावडे (६ महिने), रिवान दर्शन तावडे (६ वर्षे) या निरागस बालकांसह ७२ वर्षीय वैशाली विजय तावडे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासह पत्नी श्वेता तावडे जखमी झाले. रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता हलगर्जीपणाने कार चालवून तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेऊन कारचालक दर्शन विजय तावडे (३६) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.