आसाम येथे दुर्घटनेत चिपळूण तालुक्यातील सुभेदार शहीद

रत्नागिरी:- आसाम राज्यातील तैवान येथे चीन सिमेलगत रस्ता तयार करण्यासाठी रेकी करण्यास गेलेल्या जवानाचा दरड कोसळून दुर्देवी मृत्यू झाला. यामध्ये सुभेदार अजय शांताराम ढगळे (वय-३६) हे शहीद झाले आहेत. ते मुळचे चिपळूण तालुक्यातील मोरवणे ढवळेवाडी येथील असून त्यांच्यावर सोमवारी (दि.३) शासकीय इतमामात अत्यसंस्कार केले जाणार आहेत.

दरवर्षी या हंगामात तैवान येथे बर्फ वितळतो. यावेळी सैनिकी कारवाईसाठी चीनच्या सिमेलगत रस्ता तयार करण्यासाठी रेकी केली जाते. याकामासाठी रेकी करण्यास गेलेले सुभेदार अजय ढगळे व अन्य जवानांवर दरड कोसळली. यामध्ये ६ जण सापडले. त्यातील ५ जवान जखमी झाले. मात्र सुभेदार अजय ढगळे हे ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

२४ मार्च पासून सिक्कीममध्ये सततचा पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे. त्यानुसार भूस्खलन मोठ्या प्रमाणात झाले आहे. रेकी करण्यास गेलेले जवान अजय ढगळे व त्यांच्या टिमला काही कळण्याआधीच दरड कोसळून ते माती व बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यांच्या समवेत असलेले अन्य ५ जण बचावले आहेत.

गेले सहा दिवस भारतीय सैन्य सुभेदार अजय ढगळे यांचा शोध घेत होते. अखेर शनिवारी सकाळी शहीद जवान ढगळे यांचा मृतदेह चिखल व दगड मातीखाली सापडला. याबाबतचे वृत्त मोरवणे गावात पोहताच गावावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुली, २ भाऊ, ४ बहिणी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव सोमवारी आणले जाण्याची शक्यता असून मोरवणे येथील स्मशानभुमीत शासकीय इतमामात अत्यसंस्कार करण्यात येणार आहे..