रनपची पाणीपट्टी वसुली 57 तर घरपट्टी वसुली 75 टक्क्यांवर

रत्नागिरी:- शहरातील पाणीपट्टी थकितांचीच नव्हे तर घरपट्टी थकितदारांच्या नळजोडण्या तोडल्या जात आहेत. याचा परिणाम म्हणून या दोन्ही करवसुलीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाणीपट्टी वसुली 57 टक्के झाली असून, घरपट्टी वसुली सुमारे 75 टक्केपर्यंत पोहोचली आहे.

घरपट्टी वसुलीसाठी रत्नागिरी न.प.ची स्वतंत्र सात पथके फिरत आहेत. पाणी विभागाचे पथक स्वतंत्र असून, ही सर्व पथके शासकीय सुट्ट्यांच्या दिवशीही उन्हातान्हातून थकित वसुली करताना दिसून येत आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टी ज्यांची गेल्या अनेक वर्षांपासून थकित आहे अशा थकितदारांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. घरपट्टी वसुलीसाठी फिरणाऱ्या पथकांनी 58 नळजोडण्या तोडल्या आहेत तर 109 सदनिका व गाळे सील केले आहेत. पाणी विभागाच्या स्वतंत्र पथकाने 70 नळजोडण्या तोडल्या आहेत. नळजोडण्या तोडण्याची कारवाई परिणामकारक ठरत असून, थकित कर भरणा करण्याकडे कल वाढला आहे. थकित कर जे तातडीने भरत आहेत त्यांना नळजोडणी कोणतीही फी न आकारता नळजोडणी करून दिली जात आहे. मुख्याधिकारी तुषार बाबर, उपमुख्याधिकारी प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली जात आहे. घरपट्टी वसुलीच्या प्रत्येक पथकामध्ये वसुली लिपिक, शिपाई, एका अधिकार्यांचा समावेश आहे. ही पथके कारवाई करताना एकमेकांशी समन्वय ठेवून आहेत. घरपट्टीची वसुली मागणी 10 कोटी रूपये इतकी असून, 7 कोटी 80 लाख रूपये वसूल झाले असल्याचे वसुली विभागाचे अधिकारी नरेश आखाडे यांनी सांगितले. पाणीपट्टीची मागणी 4 कोटी 97 लाख इतकी असून, 2 कोटी 80 लाख रूपये वसूल झाले असल्याचे पाणी विभागाचे अधिकारी नंदकुमार पाटील यांनी सांगितले.