खेडमधील घरात सापडले ८० गावठी जिवंत बॉम्ब

खेड:- खेड तालुक्यातील भरणे नाका येथे एका व्यक्तीच्या घरामध्ये तब्बल ८० जीवंत गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी दोघां संशयिताना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून ही कारवाई गुरूवारी सायंकाळी उशिरा खेड पोलिसांच्या पथकाने केली.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी भरणे नाका येथील एका संशयिताच्या घरी पोलिसांनी छापा मारला असता हा गावठी बॉम्बचा साठा मिळून आला आहे. या गावठी बॉम्बचा वापर हा वन्यप्रण्यांच्या शिकारीसाठी केला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. खेडचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी खेड पोलीस स्थानकामध्ये रात्री उशिरा गुन्हा नोंदण्यात आला. दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात गावठी बॉम्बचा साठा मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोघां संशयिताला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, गेल्याच आठवड्यामध्ये तालुक्यातील खाडीपट्टा विभागात पन्हाळजे या गावी प्रमुख जिल्हा मार्गावरून एस्टी बस जात असताना त्या बसच्या टायरखाली गावठी बॉम्ब फुटून मोठा आवाज झाला होता. यासंदर्भात तक्रार झाली होती, त्यानुसार खेड पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास खेड पोलीस करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई-गोवा महामार्गावरील प्रमुख गाव असलेल्या भरणे या गावातील एका घरात पोलिसांनी धाड टाकली. या वेळी एका घरात पोलिसांना एक दोन नव्हे, तर तब्बल ८० हून अधिक घातक असे गावठी बॉम्ब सापडले